शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जगभर ख्याती आहे. याचा अनुभव सोमवारी आयरिश पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिसून आला. मालवण वराड या आपल्या वडिलांच्या गावी खासगी दौऱ्यावर आलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही भेट दिली. यावेळी सभागृहात विविध राष्ट्रीय नेतेमंडळी यांच्या प्रतिमा त्यांनी पहिल्या. त्यात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेकडे बोट दाखवत ‘ही इज शिवसेना लीडर’ असे उद्गार पंतप्रधान लिओ वराडकर यांनी काढले.
आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे पहिल्यांदा मालवण येथे वडिलांच्या गावी आले. ना गावाशी संबंध ना भाषेशी तरीही अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमेत बाळासाहेब यांची प्रतिमा पाहून त्यांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान वराडकर यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक नितीन वाळके यांच्याकडून पंतप्रधान वराडकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या हस्ते लिओ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
लिओ वराडकर यांनी शतक पार केल्याबद्दल मालवण नगरपरिषदेचे अभिनंदन करत कौतुक केले. आयर्लंडमध्ये मी देखील माझ्या राजकारणाचा प्रारंभ माझ्या शहरापासून केला. पुढे राजकीय वाटचाल करत पंतप्रधान बनलो आहे. आयर्लंड मधील पार्लमेंटमध्ये 25 टक्के महिला सदस्य आहेत. मात्र येथे मालवण नगरपरिषदेत महिला सदस्यांची जास्त संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे यावेळी लिओ वराडकर म्हणाले.