“हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू”आज 25 एप्रिल जागतिक हिवताप दिवस

मनोज सानप-जिल्हा माहिती अधिकारी

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया, जे ई, चंडीपुरा,लेप्टोस्पायरासीस, काला आजार इत्यादी आजारांविषयी व त्यावरील उपचारांची जनजागृती याचा अंतर्भाव होतो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना घोषवाक्य घोषित करते, या वर्षीचे घोषवाक्य “ZERO MALARIA STARTS WITH ME” “हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू” हे असून त्यानुसार हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी जनतेने स्वतःपासून सुरुवात करून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

त्या निमित्ताने हा विशेष लेख-
हिवतापाचा प्रसार करणाऱ्या आणि ॲनाफिलीस डासाचा शोध सर रोनॉल्ड रॉस यांनी 1897 यावर्षी लावला.हिवताप या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाची मादीमार्फत होतो. हिवताप प्लासमोडीयम हया परोपजीवी जंतूपासून होतो. हिवतापाच्या जंतूचे प्लासमोडीयम व्हायव्हॅक्स्‍ व प्लासमोडीयम फेल्सीफेरम हे दोन प्रकार आढळून येतात.
हिवतापाचा प्रसार कसा होतो :-
 डास हिवताप रुग्णास चावतो, त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात जातात तेथे वाढ होवून ते जंतू डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात.
 मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिव्हरमध्ये जातात, तेथे त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजून ताप येतो.
हिवतापाची लक्षणे-:
 थंडी वाजून ताप येणे.
 ताप एक दिवसाआड किंवा सतत येवू शकतो.
 घाम येवून अंग गार पडते, ताप आल्यानंतर डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्याही होतात.
“निदान तत्पर उपचार सत्वर”:-
हिवतापाचे निदान हे आरोग्य कर्मचारी/ आरोग्य सेविका व अप्रत्यक्ष सर्वेलन्स मध्ये रुग्णांचा रकत्‍ नमुना घेवून तपासणी करून करता येते. अशा रक्त नमुन्यामध्ये हिवतापाचे जंतू आढळून येतात. रोग निदान करण्याचे प्रामुख्याने दोन पद्धती आहेत, त्यामध्ये प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाद्वारे व तात्काळ निदान पद्धती(Rapid Dignodtic Test) द्वारे करण्यात येते.
हा हिवताप नियंत्रण कार्यक्रमाचा पाया आहे. वेळेवर रक्त नमुना घेणे, वेळेवर जो नजीकच्या प्रयोगशाळेत तपासणी व वेळेवर समूळ उपचार देणे, हे व्यवस्थापन नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख घटक आहेत. सर्व रुग्णांना वेळेवर समूळ उपचार दिल्यास हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होवू शकेल.
ताप आलेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वेक्षण रक्त नमुना घेण्यात येतो.संशयित हिवताप रुग्णास वयोगटानुसार तीन दिवस क्लोरोक्वीन गोळयांचा औषधोपचार देण्यात येतो, हिवताप रुग्णास समूळ उपचार पुढीलप्रमाणे देण्यात येतात- रक्त तपासणीमध्ये दूषित रक्त् आढळून आल्यास जंतूच्या प्रकारानुसार व रुग्णाच्या वयोगटानुसार रुग्णास चौदा दिवस प्रायमाक्वीन व तीन दिवस क्लोरोक्वीन उपचार दिले जातात. पी एफ रुग्णास एक दिवस प्रायमाक्वीन व तीन दिवस क्लोरोक्वीन च्या गोळ्यांचे उपचार दिले जातात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना-
• रुग्णास ताप आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये अथवा गृह भेटीदरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचारीमार्फत रक्त नमुना घेऊन तात्काळ तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेत पाठवावा.
• रुग्णाच्या रक्तनमुना तपासणीत हिवतापाचे जंतू आढळून आल्यास त्वरित संपूर्ण समूळ उपचार जंतूच्या प्रकारानुसार व रुग्णाच्या वयोगटानुसार घ्यावा.
• मच्छरदाणी व रासायनिक क्वॉईलचा वापर करावा.
• डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.
• साचलेले डबके वाहाते करावेत.
• घरातील पाणीसाठा आठवड्यातून एक दिवस कोरडा करुन कोरडा दिवस पाळावा.
• रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये आवश्यकतेनुसार अबेट चे द्रावण टाकावे.
• पाईपला जाळी बसवावी. नाल्या, गटारी वाहते कराव्यात किंवा त्यावर ऑइल टाकावे.
वरील सर्व माहिती समजून घेवून त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यास भविष्यात निश्चितच कीटकजन्य आरोग्याचे होणारे उद्रेक टाळता येतील.


admin: