हरतालिका व्रत सांगते; मुलींनो मुलाच्या कर्तबगारी, गुणांवर व कर्तुत्वावर विश्वास ठेवा, ऐश्वर्यावर नको

आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.

सर्वप्रथम खालील मंत्राने संकल्प करावा.
उमामहेश्वरसायुज्य सिद्धये
हरितालिका व्रतमहं करिष्ये ||

हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती, गणपती व तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.

हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो. हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला.

या व्रतला ‘हरतालिका’ एवढ्यासाठी म्हणतात.. पार्वतीच्या सखीने, मैत्रिणीने तीला पिता-प्रदेश पासून दूर घनघोर जंगलात नेले. ‘हरत’ अर्थात हरण करणे आणि ‘आलिका’ अर्थात सखी, सहेली, मैत्रीण. या मैत्रिणीच्या मदतीने पार्वतीला पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.

ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशिवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे , पार्वतीला तिच्या मैत्रणीने दूर जंगलात नेले, तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.

ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.

हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.

हरतालिका व्रताची विधी

पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते.

इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्‍या फळाचे वर्णन ‘अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी’ असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस ‘हस्तगौरी, ‘हरिकाली व ‘कोटेश्वरी’ व्रताचेही पालन करण्यात येते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास हरतालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते,

याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये तेरा वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते.

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे.

रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी.

पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी.

कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.

दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.

नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: