मंदी? कुठे आहे मंदी! अर्थमंत्र्यांचा बचाव

मंदी? कुठे आहे मंदी? असा सवाल करतानाच अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी आणि त्यानंतर उचलेल्या धोरणात्मक पावलांमुळे अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम दिसू लागले आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. कर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अडचणीत असलेल्या उद्योग क्षेत्राबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘विविध उद्योगांच्या प्रमुखांशी सरकार सतत संपर्कात आहेत. त्यांना येणाऱया सगळय़ा अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याबरोबर सल्लामसलत करून दिलासा देण्याचाही सरकार प्रयत्न करत आहे. मी या आधीही अनेक उद्योग प्रमुखांना भेटले आणि बोलले आहे. या पुढेही त्यांच्याशी सतत संपर्कात असेन.’ एसबीआय बँकेचे अन्य बँकांबरोबर विलीनीकरण करण्यात येणार आहे. मात्र, हे करताना कर्मचाऱयांची कपात करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

फक्त असंघटित क्षेत्रात नोकर कपात
विविध क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात नोकर कपात सुरू असल्याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘आता ज्या नोकऱया गेल्या आहेत की, जात आहेत असे सांगितले जात आहे त्या सगळय़ा असंघटीत क्षेत्रातील नोकऱया असून त्यांच्या निर्मितीची आणि जाण्याची नोंद कुठेच ठेवली जात नाही.

मनमोहन सिंग यांच्या टीकेला बगल
पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, ‘डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. राजकीय सुडाची भावना बाजूला ठेवून सरकारने मंदीविरोधात पावले उचलण्यासाठी समजूतदार लोकांशी बोलावे, अशी सूचना केली होती.’ त्यावर ‘ते असे बोलले असावेत, असे वाटत नाही. पण बोलले असतील तर मी याबाबत त्यांना विचारेन,’ असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.

आणखी एक झटका, जीएसटी कलेक्शन घटले
जीडीपी दरातील घसरणीनंतर मोदी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटीचे कलेक्शन एक लाख कोटी रुपयांपेक्षा खाली आले आहे. महसूल विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये फक्त 98 हजार 203 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन करण्यात केंद्राला यश आल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जीएसटीचे 93 हजार 960 कोटींचे कलेक्शन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीचे कलेक्शन 4.51 टक्क्यांनी वाढले असले तरी अपेक्षित आकडेवारीपेक्षा हा आकडा अत्यंत कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: