सहकारमंत्र्यांच्या साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासह सोलापुरातील तीन साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी हा कारखान्यांनी भरावा, असे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिले होते. या आदेशानंतरही साखर कारखान्यांनी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शुगर, इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीन साखर कारखान्यां विरोधात कर्मचारी भविष्य निधी कायदा १९५२च्या अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नातेवाईकांचे लोकमंगलचे दोन साखर कारखाने आहेत तर सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापुरातील मोठं प्रस्थ असलेल्या धर्मराज काडादी यांचा कारखाना आहे. या तीनही साखर कारखान्यांनी २०१८-२०१९च्या गाळप हंगामामध्ये ऊसतोडणी करणाऱ्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे या कारखान्यांविरुद्ध चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, कार्यकारी संचालक संतोष कुंभार, लोकमंगल शुगर, इथेनॉल अॅन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, विवेक पवार, पराग पाटील, संजय घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भविष्य कर्मचारी निधीच्या अनुशंगाने दाखल करण्यात आलेल्या या गुन्हामध्ये तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: