सर्वच आरक्षण रद्द करून,आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यात यावं -उदयनराजे भोसले

सोलापूर: आज जातीनिहाय आरक्षण देऊन समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्वच आरक्षण रद्द करा. अन्यथा सर्वांना समान आरक्षण देण्यात यावं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आरक्षणामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यात यावं, असं मत उदयनराजें भोसले यांनी व्यक्त केलं.

उदयनराजे भोसले आज सोलापुराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी वृक्षारोपण ही केलं.यावेळी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी मुस्लिम समाजात प्रसिद्ध असलेल्या शाह हुजूर अली दर्ग्यालाही त्यांनी यावेळी भेट दिली. दर्ग्यात फुलं चढवत त्यांनी डोक्यावर रुमाल बांधत प्रार्थनाही केली

शिवाजी महाराजांच्या काळातला दुष्काळ दूर होऊ शकतो, तर आता का नाही?

संपूर्ण महाराष्ट्रात आज दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळाची परिस्थिती गंभीर होती. मात्र त्यावेळी उपाययोजना होत असत, तर आता का शक्य नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजकारण होत राहील, मात्र शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. नागरिक म्हणून मलाही आता किळस आला आहे. दोन लाखांची सबसिडी देऊन प्रश्न सुटणार नाही. दुष्काळासाठी ठोस उपाय योजना गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
सोशल मीडियावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाचं पोस्टर समर्थकांकडून वायरल केलं जात आहे. ‘आपल्याला सत्तेची खाज नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे’ असं उत्तर यावर उदयनराजेंनी दिलं. आपल्यापेक्षा जास्त तज्ज्ञ लोक आहेत, असं म्हणत आपण यासाठी इच्छुक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम तोडा आणि माणसे जोडा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. तुम्ही ईव्हीएमवर झालेल्या मतदानातून निवडून आलात, तरीही त्यावर संशय घेताय, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. मी यापूर्वीचा पराभव पचवला आहे. पण यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते पराभूत झाले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले. सगळीकडे दोन-अडीच लाखांचा फरक आहे. फेरनिवडणूक व्हावी, अशी माझी मागणी आहे. 

धिरज करळे: