सत्तेच्या समीकरणाबाबत प्रतिक्रिया देणार नाही, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाहांना भेटलो – मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यातील गेले 11 दिवस सुरू असलेल्या सत्ता स्थापनेबाबतची कोंडी सुटण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू होतील, असे संकेत शहा-फडणवीस भेटीनंतर मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहा-फडणवीस भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नसला, तरी शिवेसनेने केलेल्या मागण्यांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

“शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अमित शाहांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. महाराष्ट्रात तब्बल 50 लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून भरीव मदत मिळावी यासाठी अमित शाहांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. विमा कंपन्यांनी लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी, अशा प्रकारचे निर्देश केंद्र सरकारने द्यावे. अशी मागणीही केली आहे. याशिवाय केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळण्याचं आश्वासन अमित शाहांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं.

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात 325 तालुक्यांत नुकसान झालंय. विमा कंपन्यांसोबत अमित शाह बैठक घेणार आहेत, याबाबत सखोल प्राथमिक अहवाल गृहमंत्री अमित शाहांना दिलाय. केंद्राच्या मदतीबाबत त्यांनी होकार दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतंय याबद्दल मी आणि भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नवीन सरकारची आवश्यकता आहे आणि आम्ही त्याबाबत पूर्णपणे आश्वस्त आहोत. राज्याला नवीन सरकारची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात नवीन सरकार निश्चित बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस हे आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी एकटेच जाणून अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

सोनिया-पवार भेटही आज

राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेबाबतच्या पेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेला सत्ता स्थापनेमध्ये मदत करावी असे मत अनेक काँग्रेस नेत्यांचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसे संकेत दिलेले आहेत. या मुळे पवार-सोनिया भेटीमध्ये यावरच चर्चा होईल असे म्हटले जात आहे. फडणवीस-शहा भेटीनंतर दिल्लीत पवार-सोनिया भेट होत असून या महत्त्वांच्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता असून या भेटींनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग प्राप्त होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: