शेतकरी, धनगर, मराठा, शहरी, ग्रामीण जनता अशा सर्वांनाच या सरकारने फसवले-शरद पवार

टीम ग्लोबल न्युज: कृषिमंत्री असताना बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले. आम्ही कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आज परिस्थिती बदलली आहे. सरकार बदलले आहे. शेतकरी, धनगर, मराठा, शहरी, ग्रामीण या सरकारने सर्वांनाच फसवले. राज्य सरकारचा कारभार असा आहे की मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि करायचे काहीच नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचासाठी आज आष्टीत झालेल्या सभेत ते बोलत होते.

बीड जिल्ह्यात आलो असताना अनेक सहकाऱ्यांची आठवण येत आहे. काही जण हयात नाहीत तर काही जण तब्येतीने खचले आहेत. या बीडच्या विकासासाठी आम्ही मिळून काम केले म्हणून आज त्यांची आठवण येत आहे. स्व. गोपीनाथरावांची आठवण येत आहे. ते विरोधी बाकावर बसायचे मी देशाचा कृषिमंत्री होतो. आमची शाब्दिक चकमक व्हायची. मात्र आमच्यात वैयक्तिक मतभेद नव्हते. गोपीनाथराव गरीबांसाठी झटले आणि म्हणून त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या प्रति आदर व्यक्त करावा म्हणून तिथे उमेदवारी दिली नाही.

राजकीय मतभेद उकरून न काढणे, सर्वांना बरोबर घेऊन जाणे, जातिपातीच्या बंधनात अडकून न राहणे हा धनंजय मुंडे यांचा स्वभाव आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांना एक सन्मानाचे स्थान आहे.

बीड जिल्ह्यात ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी धनंजय मुंडे यांचे मत आम्ही जाणून घेतले. पर्याय अनेक होते. मात्र धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचे नाव पुढे केले. बीड जिल्हा हा कष्ट करणाऱ्यांचा सन्मान करणारा जिल्हा आहे. याआधीही इथल्या जनतेने सामान्य माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे या सामान्य शेतकऱ्याला उमेदवारी द्यावी ही त्यांची भूमिका होती असेही पवार म्हणाले.

बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आणि आम्हाला देखील पटले की हा बजरंग काही साधासुधा नाही. आपण जो पर्वत उचलून आणायला सांगू तो पर्वत बजरंग सोनवणे उचलून आणतील. मला विश्वास आहे की बजरंग हा विजयाचा पर्वत घेऊन दिल्लीत दाखल होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

admin: