शुभ वार्ता: उजनी 90 टक्के भरले,उजनीतून भीमा नदीत दीड लाख तर वीरमधून 70 हजार क्युसेकचा विसर्ग

पंढरपूर, दि.6- भीमा खोर्‍यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही 2 लाख 21 हजार क्युसेक झाल्याने धरणातून भीमा नदीत दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर वीर मधून सोडण्यात येणारे पाणी कमी करून 70 हजार क्युसेकचा विसर्ग नीरेत केला जात होता. सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण पाहता नीरा व भीमा काठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूरला नदीकाठच्या झोपडपट्ट्यातील नागरिकांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलविले आहे.उजनी येणारी पाण्याची आवक ही झपाट्याने वाढत आहे. खडकवासला, मुळशी, पवना, वडीवळे, चासकमान, कासारसाई, भामा आसखेडा, आंध्रा, कलमोडी या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने दौंडचा विसर्ग हा 2 लाख 21हजार क्युसेकच्या आसपास पोहोचला होता. धरण 90टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे. दरम्यान उजनी व वीर च्या पाण्यामुळे नीरा व भीमाकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूरला पाणी पातळी वाढली आहे. काही ठिकाणी शेतात पाणी पसरु लागले आहे टेंभुर्णी – अकलूज रस्त्यावरील पुलावर नीरा – भीमेचे पाणी आले आहे . या मार्गावरील वाहतूक बंद आहे .
माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा व भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठची गावे जलमय झाली आहेत . टेंभुर्णी – अकलूज रस्त्यावरील संगम येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे .

ग्लोबल न्युज नेटवर्क: