शुभवार्ताः उजनीत 24 हजार क्युसेकची आवक, नीरा खोर्‍यात ही पाऊस

भीमा खोर्‍यातील धरणांवर पावसास पुन्हा सुरूवात

पुणे- भीमा खोर्‍यातील धरणांवर जोरदार पावसास सुरूवात झाली असून उजनीच्या पर्जन्यक्षेत्रात ही वरूणराजा बरसत असल्याने दौंडजवळून या धरणात 24 हजार 172 क्युसेक पाणी मिसळत असल्याने पाणी पातळी वाढणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणात आत्तापर्यंत केवळ चार टक्के पाणी आले आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी ही नीचांकी असून वजा 55.50 टक्के अशी स्थिती आज आहे. पावसाळा सुरू होताना हे धरण वजा 59.87 टक्के होते. यात केवळ आता सव्वा चार टक्के पाणी आवक झाली आहे. हे धरण क्षमतेने भरण्यासाठी दीडशे टक्के प्रवास करावा लागणार आहे. जून महिन्यात पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस असतो मात्र यंदा मान्सूनने उशिरा आगमन केल्याने पर्जन्याचे गणित बिघडले आहे.

मध्यंतरी भीमा खोर्‍यात चांगला पाऊस झाला मात्र नंतर त्याने विश्रांती घेतली होती यामुळे चिंतेचे वातावरण होते. मागील चोवीस तासात वरूणराजा पुन्हा बरसू लागला असून भीमा व नीरा खोर्‍यात पुन्हा चांगल्या जलसाठ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील चोवीस तासात घोड उपखोर्‍यातील माणिकडोह वर 36 मि.मी, डिंभे 45 तर भीमा खोर्‍यातील कलमोडी 20, भामा 22, वडीवळे 75, पवना 66, वरसगाव 85, टेमघर 124, मुळशी 119, पानशेत 84, खडकवासला 24 मि.मी. अशी पावसाची नोंद आहे.

दरम्यान भीमा व नीरा खोर्‍यात पावसाचे प्रमाण कमी आहे व धरण ही नीचांकी असल्याने आषाढी वारीसाठी भीमा नदीत पाणी सोडता आलेले नाही. तसेच नीरा कालव्याचे पाणी ही जपून वापरले जात आहे. कालपासून पुन्हा नीरा खोर्‍यात चांगल्या पावसास सुरूवात झाली आहे.

नीरा खोर्‍यातील पाऊस
नीरा खोर्‍यात मागील चोवीस तासात चांगले पर्जन्यमान नोंदले गेले आहे. गुंजवणी प्रकल्पावर 140 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे तर नीरा देवधरवर 77 मि.मी.ची नोंद आहे. भाटघरवर 19 तर वीर 8 मि.मी. पर्जन्यमान झाले आहे.


उजनीची स्थिती
उजनी धरण वजा 55.50 टक्के असून पाणी पातळी 485.554 मीटर आहे. यात एकूण साठा 960 दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्प उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होण्यासाठी 841 दलघमी म्हणजे 29.53 टीएसमी पाणी आणखी हवे आहे. सध्या मृतसाठ्यात 33 टीएमसी पाणी शिल्लक आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: