शिवसेनेच्या बालेकिल्याला यंदा मंत्रिपदाची आशा; डॉ राहुल पाटलांची वर्णी लागणार?

परभणी । गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा लागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत शिवसेनेच्या डॉ. राहुल पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवल्याने आता या मंत्रिमंडळात नक्कीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

परभणी जिल्हा हा मंत्रिपदासाठी सदैव उपेक्षितच राहिलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला आतापर्यंत केवळ सहा वेळेस मंत्रिपद मिळालेले आहे. काँग्रेसचे स. गो. नखाते, रावसाहेब जामकर, माणिकराव भांबळे, गणेशराव दुधगावकर, सुरेशराव वरपुडकर, फौजिया खान यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपदे मिळालेली आहेत. परभणी जिल्ह्याला राजकीय वरदहस्त नसल्याने या जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. कृषी विद्यापीठ, रेल्वे ब्रॉडगेज, येलदरी व निम्न दुधना प्रकल्प यासह काळी कसदार जमीन आहे. हे सर्व असतानाही केवळ राजकीय पाठबळ मिळालेले नसल्याने या जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.

1989 पासून परभणी मतदारसंघातील मतदार शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. अनेक वेळा शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसजनांनी प्रयत्न केले; मात्र मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारालाच कौल दिलेला आहे. येथील मतदार शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असताना शिवसेनेकडूनही या जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील यांनी 81 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत विरोधी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त केले आहे. यामुळेच या मंत्रिमंडळात डॉ. राहुल पाटील यांची वर्णी नक्कीच लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदैव मागास म्हणून संबोधल्या जाणार्‍या परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यास निश्‍चितच मोठ्या प्रमाणात विकास होईल. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगांच्या हाताला काम मिळावे याकरिता मोठे उद्योगही उभे राहतील आणि गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेली विकासाची गंगा पुन्हा नव्याने सुरू होईल. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता जिल्हा म्हणून परभणीची ओळख आहे. याच जिल्ह्याने शिवसेनेला पक्ष मान्यता दिलेली आहे. मात्र, गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आता नव्याने होणार्‍या मंत्रिमंडळात डॉ. राहुल पाटील यांची वर्णी लावून जिल्ह्यावर होणारा अन्याय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: