शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाणच जास्त झाली – उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकांचे सनई चौघडे राज्यभरात वाजत आहेत. आता तर शिवसेना भाजप युतीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेला 124 जागा मिळाल्याचे आज सामनाच्या अग्रलेखातून अधिकृत जाहीर करण्यात आले आहे.

जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून या देवाण घेवाणीत… शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळालं आहे तिथे शंभर टक्के यश मिळवणारच शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच राज्यात विरोधकांची अवस्था फाटकी-तुटकी झाल्याचे फटकारेही सामनातून मारण्यात आले.

सामना अग्रलेखात काय?
– गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके–तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते.

आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!

– महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही बाजूच्या जबाबदार नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाले. तरीही प्रश्न विचारला जातोच की, ‘युती’ची अधिकृत घोषणा कधी होणार? नक्की जागांचे वाटप कसे झाले? प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरेही तुम्हीच तयार करून ठेवायची. त्यानुसार ‘मीडिया’ने जागावाटपाचा आकडाही जाहीर करून टाकला आहे.

युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे.

– भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठय़ा मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तक विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले.

– तयारी तशी 288 मतदारसंघांचीच होती. शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण होतेच. चि. आदित्यच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनआशीर्वाद मिळवला व त्याच आशीर्वादाच्या बळावर आदित्यही वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शिवसेनेची निर्मिती व गेल्या पन्नास वर्षांची वाटचाल हाच एक जनआशीर्वाद आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: