शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाले; उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे देशाचा पोलादीपणा कायम असल्याचे दिसून आले आहे. हा धाडसी निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. या निर्णयामुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

कश्मीर देशाचा अविभाज्य भाग आहे, हे दाखवून देणारा हा निर्णय असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व देशाने एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करावा, असेही ते म्हणाले. या निर्णयामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तसेच आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला आहे. या निर्णयामुळे सर्व बेड्या निघाल्या आहेत. देशाच्या एकसंधपणासाठी राजकारण बाजूला ठेवावे. देशवासीयांचे इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे आपण या निर्णयाचे स्वागत करत आहोत. सरकारने धाडसाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत या देशहिताच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जे आदळआपट करतील, त्यांचा सरकार समाचार घेईल. कश्मीर हा सदैव आपल्या देशाचा भाग आहे, होता व राहील. जे विरोध करतील, त्यांचा बंदोबस्त करण्यास सरकार समर्थ आहे. आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, अमेरिकेसारख्या इतर देशांनी यात नाक खुपसण्याची गरज नाही. आता पाकव्याप्त नव्हे तर पाकलाच व्यापले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: