मुंबई | गेल्या 15 दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडत आहे. मात्र सोमवारी संध्याकाळी छातीत वेदना होत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची अँजिओग्राफी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लिलावती रुग्णालयात जाऊन आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवारही होते. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान राऊतांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सोमवारी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे. दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली.