विरोधकांनी मला शिव्यांची लाखोली वाहत माझ्यावर अन्याय केला-मोदींची टीका

कुरुक्षेत्र : विरोधकांनी मला औरंगजेब, रावण, हिटलर, दुर्योधन आणि गंगू तेली… असे म्हणून हिणवले. रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणत मला शिव्या दिल्या. माझे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारत त्यांनी माझ्या आत्मसन्माला धक्का लावला. मला शिव्यांची लाखोली वाहिली. माझ्यावर अन्याय केला, असा संताप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर व्यक्त केला.
ते कुरूक्षेत्र येथील जाहीर प्रचारसभेत बोलत होते. राजीव गांधी यांच्यावर अतिशय असभ्य टीका केल्यानंतर काँग्रसेन मोदी आणि भाजपला चांगलेच घेरले आहे. त्यावर मोदींनी हा संताप व्यक्त केला आहे.

मोदी म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी मनमानी करू देत नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराला मी लगाम घालतो, त्यांच्या घराणेशाहीवर तुटून पडतो, त्यामुळे हे लोक वारंवार माझ्यावर टीका करतात. साळसूदपणाचा आव आणून मला शिव्या घालत आहेत. याच लोकांनी भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मी पंतप्रधान झालो, हे अनेकांना पाहवंल नाही. त्यांनी माझी मूर्ख पंतप्रधान म्हणून संभावना केली.

मला जवानांच्या टाळूवरचे लोणी खाणारा दलाल म्हटले. गद्दाफी, मुसोलिनी, हिटलरसारखे शब्द वापरून मला हुकूमशहा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही लोकांनी मला मनोरुग्ण तर काही लोकांनी नीच म्हटले. माझे वडील कोण होते? माझे आजोबा कोण होते? असे सवालही त्यांनी केले. त्यांच्या एका नेत्याने मला व्हायरस म्हटले, तर दुसऱ्याने दाऊद म्हटले. काँग्रेसचे नेते ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात, त्यांनी तर माझी मौत का सौदागर म्हणून संभावना केली. त्यांची प्रेम करण्याची हीच पद्धत आहे का? काँग्रेसच्या डिक्शनरीतील हेच प्रेमाचे बोल आहेत का?

समझोता एक्सप्रेसमध्ये ब्लास्ट झाल्यावर त्यांनी हिंदू दहशतवाद ही संकल्पना रुढ करण्यासाठी निरपराध लोकांना अनेक वर्ष तुरुंगात सडवले. मात्र काँग्रेसच्या या षडयंत्राचा पर्दाफाश झालाच. बालाकोट नंतर आमच्या एका वीरपुत्राला पाकिस्तानने पकडले होते. ४८ तासांच्या आत पाकिस्तानला त्यांना सोडावे लागले. ते वाघा बॉर्डपर्यंत सोडायला आले. तेव्हा काँग्रेसच्या भाटांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक केले. पाकच्या पंतप्रधानांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणीही याच काँग्रेसवाल्यांनी केली होती, अशी टीका मोदींनी केली.

admin: