विधिमंडळात एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई | मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या अधिवेशनात नाराज एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. विरोधकांच्या तुलनेत खडसेंनी सरकारला जास्त प्रश्न विचारले.

आदिवासी विद्यार्थांच्या प्रश्नांवरून एकनाथ खडसे यांचा संताप झाल्याचे पाहायला मिळाले. आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? तसेच आदिवासी आश्रमशाळेतील मुलांच्या प्रश्नांसदर्भात अनेक निर्णय झाले, पण त्यांची अंमलबजावणी सरकारकडून केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आताच्या आदिवासी मंत्र्यांना या निर्णयाची माहिती नाही का? तसेच निर्णय झालेला असताना नवीन निर्णय घेऊ, असे उत्तर कसे दिले जाते. तसेच गेली 6 वर्षे मी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, पण सरकार आदिवासी प्रश्नांवर गंभीर नाही का? असा सवाल खडसेंनी सरकारसमोर उपस्थित केला.

यासोबतच सौरपंपांच्या विषयावरूनही एकनाथ खडसेंनी मंत्र्यांना झापले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचे आरोप खडसेंनी केले आहेत. तसेच नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरांवर संताप व्यक्त करत एकनाथ खडसेंनी सरकारला धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जुन्या निष्ठावान आमदारांना संधी मिळत नाही. मी राजीनामा दिल्यानंतर कित्येक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र त्यांनी कोणीच राजीनामा दिला नाही. आता निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 10, शिवसेनेचे 2 तर रिपाइंच्या एका नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली. या नव्या मंत्रिमंडळात आयात नेत्यांना प्राधान्य देण्यात आले. मात्र, खडसेंना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आले आहे. यामुळेच एकनाथ खडसे यांनी नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांची ही नाराजी अधिवेशनातही पाहायला मिलाली आहे.

धिरज करळे: