विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आपला अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे उमेदवारी अर्ज सोपवला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान, विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने 5 तर भाजपने 4 उमेदवार दिले आहेत.
राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांचा अर्ज दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे व पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
सोमवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.