विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर

मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांची नियुक्ती केली असून त्याना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शपथ दिली.

राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल यांनी श्री.कोळंबकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री.कोळंबकर हे भाजपचे मुंबईल आमदार असून ते सहा वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी झाला पाहिजे असा निर्णय दिला. तसेच बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे आणि कोणत्याही प्रकारचे गुप्त मतदान नको असे आदेशही न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिला आहे.

दरम्यान सरकार स्थापन करण्यासाठी आमदारांची पुरेशी संख्या नसल्याने भाजप विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात आता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीतून भाजपने माघार घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: