शरद पवार म्हणतात; महाराष्ट्राचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती जावं यासाठी आम्ही…

ग्लोबल न्युज नेटवर्क: महाराष्ट्रात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याची आवश्यकता होती. कालच्या निवडणुकीत लोकांकडून हा निर्णय आपल्याला मिळाला. आता अपेक्षा आहे की महाराष्ट्र हे राज्य सुस्थितीत यावं.

महाराष्ट्राचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती जावं यासाठी आम्ही सर्व पक्षांनी मिळून निष्कर्ष काढला आणि ही जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महा विकास आघाडीची स्थापना करून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली त्यानंतर शरद पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून त्यात म्हटलं आहे की,

आमचे अनेक सहकारी बाहेरून मार्गदर्शन करत असायचे. आता ते आखाड्यात आले आहेत. त्यांची आता काही सुटका नाही. मात्र तुमची-आमची जबाबदारी आहे की त्यांना या कामात यश मिळावं. आपण जरी वेगवेगळ्या मार्गाने निवडणुकांना सामोरे गेलो असलो तरी महाराष्ट्र देशाला क्रमांक एकच राज्य बनवण्यासाठी योग्य कारभार करत ते जी पावलं टाकतील त्या पावलांना आपली अंतःकरणापासून अखंड साथ मिळावी असा विश्‍वास आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देत आहे. त्या जोरावर महाराष्ट्राची जपणूक करणारे काम त्यांच्याकडून होईल.

जे दुखावले गेले आहेत, त्यांचे दुःख सातत्याने व्यक्त होत आहे. परंतु केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष होईल अशी ज्यांना चिंता वाटते ती त्यांनी करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्राकडेही देशाचा हिस्सा म्हणून केंद्राने बघावं व महाराष्ट्राला योग्य ती मदत मिळावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे.

मंत्रिमंडळाचा कार्यक्रम लवकरच आपल्याला घ्यावा लागेल. कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीला विविध प्रश्नांवरची धोरणे मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे विधिमंडळ असते व राज्यपालांच्या मुखातून यासंबंधीची नीती मांडण्याचं काम आपल्याला करावं लागेल. त्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवावे लागेल. त्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: