लोकशाही टिकवायची असेल तर…ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा, 

अकोला : काँग्रेस – राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांबरोबर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कसलेही सूत जुळत नाही. पण या दोन्ही पक्षांच्या समर्थनार्थ आंबेडकर यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यामुळे सामान्य मतदारांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

‘लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची गरज आहे. मात्र या सरकारने विरोधी पक्ष संपविला असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांचा हा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताचा असल्याने मानले जात आहे.

सामान्य लोकांवर अन्याय करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ९ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, आंध्र प्रदेशामधील विजय शंकर नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने महत्वाची कबुली दिली आहे. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावरून आपण बॉम्बस्फोट घडविल्याचे या कार्यकर्त्याने म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशीही व्हायला हवी, असेही आंबेडकर म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2014 च्या निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हे लपविले होते. त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली नाही याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसच्या नेत्यांवर ४२० चे गुन्हे दाखल आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करतानाच लोकशाही टिकवायची असेल, तर विरोधी पक्ष जिवंत असला पाहीजे, असे आग्रही मत आंबेडकर यांनी मांडले.

वंचित समाजाने एकत्र येवून देशाला लुटणाऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडावे असे आवाहन जिजाऊंचे तेरावे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांनी केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: