राष्ट्रवादीत फिल्डिंग आल्यावर पळून जाणारे काही नेते होते : प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

सोलापूर: क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाल्यानंतर फिल्डिंग करण्याची वेळ येते तेव्हा काही खेळाडू पळून जातात. तसेच काहीसे नेते राष्ट्रवादीत होते. सत्ता जाताच ते पळून जाऊ लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे . 

सोलापूरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी ते बोलत होते .  

दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे त्या भागातील सर्वसामान्य तरुणांना संधी मिळेल.राष्ट्रवादीत अन्याय झालाय म्हणून मोहिते-पाटील भाजपत गेले त्यांना तिथे ना उमेदवारी मिळाली ना, ना त्यांना कोठे संधी मिळाली? आता त्यांच्यावर अन्याय नाही का? असा सवालही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता लगावला.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे असे सांगितले.

विधानसभा निवडणूक तयारीसाठी राज्यात 27 दौरे केल्यानंतर काही ठिकाणचे पदाधिकारी निष्क्रिय आढळले. काही ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते आढळले. जुलै अखेरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील दौरे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी युवकचे नवीन पदाधिकारी जाहीर केले जातील अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युवकला 15 ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मकता दर्शविली असून ज्या ठिकाणी युवकांची बूथ बांधणी चांगल्या पद्धतीने झाली आहे त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

ग्लोबल न्युज नेटवर्क: