शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने बसलेल्या धक्क्यातून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप सावरली नसतानाच कमळाच्या अतिवृष्टीत आणखी काही काटे गळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा गट लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. महाजनादेश यात्रा साता-यात येण्या आधीच रामराजे गोटात भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात ही नवी ऑगस्ट क्रांती लवकरच होऊ घातली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याचे राजकारण लक्ष्मणराव पाटील व रामराजे ना. निंबाळकर या दोन नेत्यांच्या हातात दिले. लक्ष्मणराव पाटील यांना बरोबर घेवून रामराजेंनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यात सर्वच आमदारांनी त्यांना साथ दिली. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून सातार्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राज्यात निर्माण झाला. मात्र, मधल्या काळात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांचे संबंध कमालीचे ताणले गेले. दोघांमधील वितुष्ट पराकोटीला गेले.
महायुतीची आक्रमक व्यूहरचना
सातारा जिल्ह्य़ातील उभय काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. पाटण व फलटण विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सहा मतदारसंघांत भाजप यश मिळवेल, असा दावा त्यांनी गेल्या आठवडय़ात केला आहे. जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. साताऱ्यातील छत्रपतींचे वशंज पक्षात यावेत, असा भाजपचा अनेक दिवस प्रयत्न होता. त्याला शिवेंद्रराजेंच्या रूपाने यश आले आहे, तर भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत घरवापसी केली आहे.