राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप

लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग यशस्वी

मुंबई, दि. १५: सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. या उत्पादनाला ब्रॅँडिंगची जोड दिली तर नक्कीच शेत मालाला जास्त दर मिळतील असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज राहुरी कृषि विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रशिक्षण समारोपात सांगितले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावर एक आठवड्याचे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. आज त्याचा समारोप झाला. त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री श्री. भुसे बोलत होते.

यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक श्री. विजय कोते, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि आयोजन सचिव डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

श्री. भुसे यावेळी म्हणाले, राज्यात १५८५ शेतकरी गट असून त्याद्वारे सुमारे ६५ हजार शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या राज्यात शेतकरी उत्पादन घेतो पण त्याची विक्री करणे अवघड जाते. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेंद्रिय शेतीचे धोरण ठरवताना शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करुन ज्ञानदानाचे काम केले याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. मनुष्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेंद्रिय कृषि माल सेवन करणे उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे सेंद्रिय शेतीला भविष्य काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वासही कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: