खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ
हाँगकाँग : हाँगकाँग शेअर बाजाराने (एचकेईएक्स) लंडन शेअर बाजार (एलएसईजी) खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी ३६.६ अब्ज डॉलरला देण्याची हाँगकाँग शेअर बाजाराने ऑफर दिली आहे. हाँगकाँग शेअर बाजार हा आशिया खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे.
मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. “महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. आमच्यासारख्या अन्यायग्रस्तांना भजपचाच आधार आहे. मी कुठलीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. माझ्यावर पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल.” अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्याबरोबर नवी मुंबई पालिकेतील 48 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या. नव्या सुधारणांसह मोटार वाहन कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. त्याच्या राज्यातील अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्तिथीत नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित ‘महाजानदेश यात्रे’चा समारोप होणार आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. तर 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
मुंबई : कार्यकर्तेच पक्षाला विजयी करतात. त्यामुळे पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दुर्लक्षिले जाणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. जुन्या कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी एक व्हिडियो प्रसारित केला आहे. यामध्ये भाजप हा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा पक्ष आहे, असे ते म्हणाले. तसेच कार्यकर्ता हाच पक्षाचा पाया, आधार आणि कळस आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी, मतदार नोंदणी, मतदान केंद्र आणि ईव्हीएम / व्हिव्हिपॅट संदर्भात माहिती दिली.
आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा लोकेश याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांना होणाऱ्या मारहाणी विरोधात ‘चलो अतामाकुर’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याच्या शक्यतेने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील राजकीय वातावरण पेटले आहे.
बंगळूरू : इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे. आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.जेपीएल ही नासाशी संबंधित असलेली प्रयोगशाळा आहे. पण विक्रमकडून अजून कुठलाही सिग्नल मिळालेला नाही.
अमरावती : लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजातील मते मिळाली नाहीत. तरीदेखील काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे. मात्र एमआयएमसोबत झालेल्या तुटातुटीचा काही फरक पडणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजातील २५ उमेदवार असतील, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
इंदापूर : इंदापूरच्या जागेसंदर्भातून झालेल्या रणसंग्रामानंतर काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.
बारामती : माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इंदापूरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेले सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द हर्षवर्धन पाटील यांना दिला होता असेही अजित पवार म्हणाले.
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रांजणी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मंचर पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 15 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. या प्रकरणी धनंजय गंगाराम वाघ वय 45 या आरोपीला ताब्यात घेण्यात आली आहे.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी, शिर्पनहळ्ळी ग्रामस्थांनी उजनीच्या पाण्यासाठी येणार्या विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 25-30 वर्षापासून पिण्यासाठी व शेतीसाठी उजनीच्या पाण्याची प्रतीक्षा करीत आहोत परंतु पाणी काही मिळाले नाही. त्यानंतरही आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही सामुहिकरित्या आत्मदहन करू असा इशारा दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पंढरपूर : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं श्राद्ध घालू ,असा इशारा देण्यात आली आहे. तसेच आंदोलनात सहभाग घेतलेल्या मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाही, याकडेही मराठा समाजाच्या नेत्यांनी पंढरपुरात लक्ष वेधलं.