महाहौसिंगच्या समर्पित गृहप्रकल्पांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपुर्तीकडे पाऊल ना.विखे-पाटील
गरिबांना परवडेल अश्या किंमतीमध्ये घरे देण्याचा प्रयत्न : ना.मिरगणे
सोलापूरात चार गृहप्रकल्पाचे ना.विखे-पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन
सोलापूर : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या पुढाकारातून सोलापूरात एकाच दिवशी पोलीस, होमगार्ड, बांधकाम कामगार व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी समर्पित गृहप्रकल्पांचा होणारा शुभारंभ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात सर्व बेघरांना घरे मिळावीत या स्वप्नपुर्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे असे गौरवोदगार गृहनिर्माणमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढले.
सोलापूरात आज ना.विखे-पाटील यांच्या हस्ते स.नं.211, कमिशनर ऑफिसच्या मागे, शासकीय वसाहत, सोलापूर व स.नं.119, विकास नगर, पोस्टल कॉलनी, सोलापूर व स.नं.63/9, अंत्रोळीकर नगर, सोलापूर व मजरेवाडी, सोलापूर येथील एकूण 13500 घरे असलेल्या सहा गृहप्रकल्पाचा भुमीपुजन झाल्यानंतर मजरेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापौर सौ.शोभा बनशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दिपक तावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, महाहौसिंग संचालक शंकर भिसे, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक बाबा मेस्त्री, हारूण सय्यद, आर.एस.एम.युनिटी डेव्हलपर्सचे संचालक कफिल मौलवी, कुमारी पुनम मिरगणे, आदिल मौलवी, भरत जैन, जयधवल करकमकर आदी उपस्थित होते.
यावेळी ना.विखे-पाटील म्हणाले, समाजातील छोट्या व शेवटच्या आणि आर्थिक दुर्बल व कमी उत्पन्न असलेल्या समाजघटकांना घरे मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यानी या उद्देशानेच महाहौसिंगची स्थापना केली. राजेंद्र मिरगणे यांनी कमी वेळेत राज्यात मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिले. नफा मिळवणे हे या गृहप्रकल्पांचे ध्येय नाही. तर गरिबांना निवारा देण्याचे काम या प्रकल्पातून होणार आहे.
यावेळी ना.मिरगणे म्हणाले, सोलापूरातील गृहप्रकल्प हे संपुर्ण राज्यात आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारण्यात येणार्या गृहप्रकल्पांच्या दृष्टीने पायलट प्रोजेक्ट आहेत असे मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत. या गृहप्रकल्पातून दिल्या जाणार्या घरांच्या बांधकाम कामगार सदरातील लाभार्थ्यांना बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे 2.00 लाख व केंद्र व राज्य सरकारच्या घर बांधण्यासाठी 2.50 लाख अनुदान मिळणार आहे. तसेच लाभार्थ्यांना स्वत: भरावयाच्या रक्कमेसाठी सारस्वत, आय.सी.आ.सी.आय, मुथुट फायनान्स सारख्या वित्त संस्थांच्या माध्यमातून केवळ के.वाय.सी. डॉक्युमेटंसच्या आधारे कर्ज मिळणार आहे. सोलापूरात महापालिका कार्यक्षेत्रात 76 हजार पेक्षा जास्त गरजू बेघरांची संख्या आहे. त्यामुळे हे गृहप्रकल्प यशस्वी होतील. किमान 100 वर्षे टिकावीत अशी घरे गरिबांना स्वस्तामध्ये दिली जाणार हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी प्रकल्प सल्लागार अमोल मेहता यांनी मजरेवाडी येथील गृहप्रकल्पात 11 एकरात 29 इमारतीमध्ये एकूण 2408 सदनिका आहेत. पाणी, रस्ते, लाईट, क्रिडांगण, उद्यान बरोबरच लिफट पासून पार्किंगपर्यंत सर्व सुविधा आहेत असे सांगितले.
यावेळी बोलताना संचालक कफिल मौलवी यांनी गुणवत्ता पुर्णरित्या निर्धारित कालावधीत हा प्रकल्प बांधुन पुर्ण होईल असे सांगितले.
यावेळी बार्शीचे भाजपा तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, भाजयुमो तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष महेदिमिया लांडगे, शहरसरचिटणीस बापू कदम, विस्तारक बाबा शेख, रविंद्र सांगोळे, दिनेश परदेशी, शिरीष घळके आदी उपस्थित होते.