राज्यातील सर्व ग्रामपंचायती कुलूपबंद, ग्रामसेवकांनी चाव्या आणि शिक्के दिले पंचायत समितीकडे

ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा, ग्रामपंचायतींना कुलुप लावून चाव्या व शिक्के केले पंचायत समितीकडे सुपुर्द

धीरज करळे

बार्शी: राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी लेखी निवेदने देवूनही मागण्या मान्य न केल्याने राज्यातील ग्रामसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून राज्य स्तरावर धरणे आंदोलन करुन निवेदने देऊन ही शासनाचे कोणतीच दखल घेतली म्हणून आज बार्शीत ग्रामसेवक युनियनच्यावतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कुलुप लावून चाव्या व शिक्के पंचायत समितीकडे सुपुर्द केले.

मागील दहा दिवसापुर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश काटे, सचिव गोपाळ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविकांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 9 आॅगस्ट ते 22 आॅगस्टपर्यंत असहकार असणार असून यामध्ये एकदिवसीय धरणे, निदर्शने, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन आदी आंदोलनाचे टप्पे झाले़ ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली़ यानंतर ही मागण्यांची पुर्तता केली नाही .


त्यामुळे आतापुढील काळात आंदोलन तिव्र करण्यात येणार आहे़ त्यानूसार आज 22 आॅगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलनाचे भाग म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुप लावून चाव्या तसेच शिक्के पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अवघडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले़ जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना कोणताही अहवाल सादर करणार नाहीत व त्यांच्या बैठकांना जाणार नाहीत.

या आहेत मागण्या

युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समान काम समान दाम, समान वेतनश्रेणी, लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामविकास अधिर्कायांच्या पदामध्ये वाढ करणे, पदवीधर ग्रामसेवकांच्या नेमणुका करणे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करणे. 2005 अन्वये ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श ग्रामसेवकाला आगावू वेतन वाढ करणे, एक गांव एक ग्रामसेवक पद निर्मिती करणे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले असल्याचे तालुकाध्यक्ष अंकुश काटे यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: