रणजितसिंहा पाठोपाठ आता धवलसिंह मोहिते ही निंबाळकरांच्या पाठीशी, माजी आमदार राऊत यांची यशस्वी मध्यस्थी

अकलूज : मागील कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात लढणारे, सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले, अकलूजचे मोहिते पाटील घराणे आता फलटणच्या नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी एकत्र आले आहे.

जनसेवा संघटनेचे प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही अखेर आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना जाहीर केला आहे. यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व मोहिते पाटील परिवार एकत्रित भाजपच्या मागे उभा राहिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यामध्ये महत्वपुर्ण भूमिका बजावली आहे.

डॉ. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब विजयसिंह मोहिते कुटुंबाच्या विरोधात काम करीत होते. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून उभी केलेली फळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागे आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या दिवशीच धवलसिंह यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. यानंतर गेल्या आठवड्यात सांगोला येथे शरद पवार आले असता पुन्हा धवलसिंह यांची दुसरी बैठक झाली होती. मात्र काल रात्री माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
आता सर्व मोहिते एक झाल्याने व डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे बळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाल्याने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात निंबाळकर यांचे बळ वाढले आहे. तर संजय शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. हा राजाभाऊ राऊत यांनी शिंदे यांना दिलेला धक्का मानला जात आहे.

admin: