यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 50 हजार कोटींचा चुराडा, मागील निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के वाढ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
भारतात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. वेगवेगळे पक्ष ९० कोटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ही आतापर्यंतची जगातील सर्वात खर्चिक निवडणूक असल्याचे मानले जात आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार २०१४ मधील मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा ४०% जास्त खर्च होत आहे. यात सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. यामुळे कंपन्यांत उत्पादन आणि सेवा यांची स्पर्धा सुरू आहे. निवडणुकीच्या हंगामात उत्पन्न वाढवणाऱ्या या कंपन्यांची माहिती घेऊयात.

निवडणुकीत छोटे-मोठे हजारो नेते जनसंपर्क आणि सभा घेत आहेत. त्यासाठी गाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गाड्या जास्त सुरक्षित असाव्यात त्यासाठी त्यांना बुलेटप्रूफ बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. बुलेटप्रूफिंगचे काम करणाऱ्या सुमारे ३० कंपन्यांतील कर्मचारी निवडणुकीच्या काही महिने आधीपासूनच ओव्हरटाइम करत आहेत. यातील एक लॅँगर इंडस्ट्रीज आहे. या कंपनीने आतापर्यंत ३५ गाड्या बुलेटप्रूफ केल्या आहेत. कंपनीचे संचालक संचित सोबती यांनी सांगितले की, मॉडेलच्या हिशेबाने बुलेटप्रूफिंगसाठी ६ लाख ते ४० लाख रुपयांपर्यंतचा खर्च आकारला जातो.

हेलिकॉप्टर-प्लेन : १ तासाचे भाडे २.५ ते ४.५ लाख रु.

लोकसभा निवडणुकीत प्रवासासाठी हेलिकॉप्टर आणि खासगी विमानाच्या मागणीत मोठी वाढ होते. मोठ्या नेत्यांना कमी काळात जास्त ठिकाणी पोहोचवण्यासाठी यांचा वापर होतो. हेलिकॉप्टरचे प्रतितास भाडे सुमारे १.५ ते २.५ लाख रुपये असते. तर, विमानाचे भाडे ४.५ लाख रुपये प्रतितासापर्यंत असते.

इमेज मेकिंग : ट्विट ते भाषणापर्यंत उपलब्ध

अनेक कन्सल्टन्सी संस्था नेत्यांची प्रतिमा (इमेज) चमकवण्याचे काम करतात. यात नेत्यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाचे काम केले जाते. त्यासाठी ट्विटपासून ते भाषणापर्यंत तयार केले जातात. केव्हा-कोठे-काय बोलायचे याचे धोरणही ठरवले जाते. यासाठी हजारांपासून ते लाखांपर्यंत शुल्क आकारले जाते.

झेंडे, पोस्टरच्या धंद्यात मंदी, खर्च काढणेही अवघड

भारतात अलीकडच्या काळापर्यंत झेंडे, पोस्टर, टोपी, बॅग्ज आणि टी-शर्ट बनवणे निवडणुकीत फायदेशीर होते. मात्र, यंदा इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे हे क्षेत्र मागे पडत आहे. या कामात असलेल्या कंपन्यांना यंदा हाेणारा खर्च काढणेही अवघड झाले आहे. त्यांच्या व्यवसायात ५०% पर्यंत घट झाली आहे.

admin: