मोदींनी प्रखर राष्ट्रवाद मांडून प्रचाराची दिशाच बदलून टाकली:शरद पवार

मुंबई: समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सोयीस्कररीत्या केला. लोकांच्या भावनेला आवाहन करून त्यांनी प्रखर राष्ट्रवाद मांडला आणि प्रचाराची दिशाच बदलून टाकली असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेऊन त्याचे विश्लेषण करण्यासाठी आज पक्षाच्या कोअर कमिटीची मुबंईत बैठक घेण्यात आली. पक्षाची ताकद किती आहे, निवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

देशात सत्ताबदल होणार, असे अनेक अभ्यासक, जाणकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे मत होते.. मात्र झाले उलटेच, लोकसभा निवडणुकांचा निकाल अत्यंत वेगळा लागला.आज देशात बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सर्व गोष्टींचा फटका सरकारला बसणार होता, मात्र पंतप्रधान मोदींनी सोयीस्कर आढावा घेत प्रचाराचे सूत्रच बदलले

निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. माझे मत हे बरोबर गेले आहे की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे.

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात आहे.

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढा. आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हा एकच विचार आता, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ.

एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त ६ जण होतो. मात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले. त्यात सर्व नवे चेहरे होते.

आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही ४० लोक आहात, तुमचा ४० लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा..

पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील.

NCP 2019 #Meeting #Mumbai

admin: