मोठा अनर्थ टळला । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

अलिबाग । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र, प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.

हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. 4 वाजून 25 मिनिटे आणि 30 सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले.

तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत. हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: