मृदुंग, टाळ, भजनाच्या गजरात आळंदीनगरी दुमदुमली

पुणे : संपत्ती सोहळा नावडे मनाला।
लागला टकळा पंढरीचा।।
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, मंगळवारी (दि.25) रोजी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष, हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली. देवस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रस्थान सोहळानंतर माउलींची पालखी आळंदीतच आजोळघरी मुक्कामी राहील.

प्रस्थान काळात आळंदी शहर स्वच्छ राहावे, म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून वेळच्या वेळी साफ सफाईवर भर देण्यात आलेला आहे. मुख्य मंदिरात संस्थानच्या वतीने सुरक्षेच्या खबरदारी घेण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, ठिकठिकाणी शिस्त लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परिसरात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या वारकर्‍यांनी आळंदी गजबजली आहे.

आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले असून, रस्ते गर्दीने फुलेले आहेत. हरिनाम गजर, कीर्तने, प्रवचने तसेच धार्मिक उत्सवाला टाळ, मृदंग, वीणेचा साथ मिळत आहे. अलंकापुरी भक्तिरसात न्हाहली आहे. आषाढी वारीसाठी आलेल्या शेकडो दिंड्या आणि हजारो वारकर्‍यांमुळे आळंदी नगरी गजबजून गेली आहे. तसेच प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आळंदीत हजारो भाविक दाखल झाले आहेत. प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचे मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट तसेच संपूर्ण आळंदी शहरातच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

शहरात मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाटाच्या दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आळंदीत दर्शनबारी, आजोळघर येथेही पोलिसांचा खडा पहारा आहे. ग्रामीण आणि पुणे शहर पोलिस असा दुहेरी बंदोबस्त आळंदीत तैनात करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: