मुंबई । महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन होणार आहे. या महाआघाडीच्या नेते पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्क अर्थात शिवतिर्थावर हा शपथ विधी सोहळा पडणार आहे.
दरम्यान, मुंबईतील सेना भवन जवळ बाळ ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चित्र असलेले पोष्टर लागले आहे. या पोष्टरवर “बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री” असा मजकूर लिहण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे एकत्र पोष्टर लागल्याने हे पोष्टर सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरत आहे.