नवी दिल्ली । उद्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठीकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे. या सोळ्यासाठी देशपातळीवरील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आज रात्री उशीरा शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळयाचे निमंत्रण त्यांना दिले.
सोनिया गांधी यांची भेट घेऊन निवासस्थाना बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्या महाराष्ट्रात नव्या आघाडीचे सरकार स्थापन होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आम्ही सोनिया गांधींचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो होतो. यावेळी त्यांना शपथविधी सोहळ्यास उपस्थित रहावे असे निमंत्रण दिले आहे. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आम्ही आमंत्रित केले आहे.
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन होणार आहे. या महाआघाडीच्या नेते पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्क अर्थात शिवतिर्थावर हा शपथ विधी सोहळा पडणार आहे.