माझा विजय निश्चित असल्याने विरोधकांचा बेछूट आरोप
अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांची स्पष्टोक्ती
बार्शी:
माझा विजय निश्चित दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून त्यांच्याकडून विनाकारण माझ्यावर षडःयंत्र रचून साकतच्या सभेची क्लिप व्हायरल करुन विरोधकांकडून माझ्यावर बेछूट आरोप करण्याचे काम सुरु असल्याचे सांगत त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे अपक्ष उमेदवार राजेंद राऊत यांनी खंडण केले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून साकत येथील सभेची क्लिप व्हायरल करुन माझ्यावर विरोधकाकडून आरोप सुरु आहेत. तरी सध्या आचारसंहिता असल्याने प्रत्येक उमेदवारासोबत शासकीय कॅमेरे आहेत. त्या कॅमेर्यात झालेले चित्रीकरण पाहून माझे वक्तव्य तपासले जावे.
नेहमीप्रमाणे विरोधक विकासाच्या मुद्याला बगल देवून, वेगळा विषय घेवून, शब्दांचा विपर्यास करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. मी गेली 5 वर्षे केलेली जनतेची सेवा व विरोधकाचे 5 वर्षांपासून तालुक्याकडे असलेले दुर्लक्ष एवढ्यावरच निवडणूक व्हावी ही माझी माफक अपेक्षा आहे.
रविवार दि. 13 रोजी साकत येथे झालेली सभा व त्यानंतर उशीराने का व्हायरल करण्यात आली असल्याचे सांगत मला बदनाम करण्याच्या हेतूने ही राजकीय स्टंटबाजी आहे. तसेच याबाबत आम्ही शासकीय यंत्रणेकडे अर्ज देवून चित्रफित उपलब्ध करुन घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी काही आक्षेपार्ह नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, रावसाहेब मनगिरे, कुंडलिकराव गायकवाड, नवनाथ चांदणे, प्रशांत कथले आदी उपस्थित होते.