माझा महाराष्ट्र… भगवा महाराष्ट्र; 1 लाख नवे शाखाप्रमुख नेमणार

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये एक लाखांवर शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. गावागावांमध्ये भगवे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुख नियुक्त केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या नियुक्त्या करताना कडवट शिवसैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी प्रास्ताविक करताना ‘माझा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना विशद करून सांगितली. गेल्या पाच वर्षांत आलेले कडवट अनुभव पाहता आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम राबवणे ही काळाची गरज आहे असे नेरूरकर यांनी सांगितले. येत्या 27 जुलैच्या आत शाखाप्रमुखांच्या नेमणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. संबंधित विभागप्रमुखांनी या नेमणुका करताना स्वतःचे नातेवाईक नको, तर कडवट शिवसैनिकांचाच विचार करावा असे उद्धव ठाकरे यांचे आदेश असल्याचे नेरूरकर यांनी सांगितले. नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्रे बनवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये 14 ते 27 जुलै या पंधरवडय़ात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

…असे असेल अभियान

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शिवसैनिक नोंदणी करण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायत प्रभागात पुरुष आणि महिला शाखाप्रमुख नेमले जातील. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डामध्ये एक उपशाखाप्रमुख नेमण्यात येईल. नेमणुका करण्यापूर्वी त्या शिवसैनिकांकडून शिवसैनिक नोंदणी अर्ज भरून घेतले जातील. शाखाप्रमुख आणि शाखा संघटक पदांवर ज्या शिवसैनिकांची निवड होणार आहे त्यांचा शिवसैनिक नोंदणी अर्ज छायाचित्रासह 1 ते 7 जुलैपर्यंत शिवसेना भवन येथे जमा करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे साधणार शेतकर्‍यांशी संवाद

शेतकर्‍यांना पीक विम्याचे दावे मिळवून देण्यासाठी शिवसेनेने ग्रामीण भागांमध्ये मदत केंद्रे स्थापन केली. त्या मदत केंद्रांना उद्धव ठाकरे हे स्वतः भेटी देणार असून त्यावेळी शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवादही साधणार आहेत. येत्या 22, 23 आणि 24 जून रोजी त्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱयात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य नेते, मंत्री आणि पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

धिरज करळे: