महालक्ष्मीच्या(पूरग्रस्तांच्या) मदतीला तुळजाभवानी, पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

उस्मानाबाद : सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र सरसावला आहे. स्थानिक लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील देवस्थानेही कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

तुळजापूरच्या तुळजाभवनी संस्थानाने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्ताना 50 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरच्या मदतीसाठी धावून आली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने कोल्हापूर, सांगलीला 50 लाख रुपयांची मदत करणार आहे. ही मदत तीन टप्प्यात मदत दिली जाणार आहे. यातील 25 लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले जाणार आहे. त्याशिवाय 15 लाख रुपयांचे अन्नधान्य कोल्हापूरकडे रवाना केले जाणार आहे

तर उर्वरित 10 लाख रुपयांची मदत स्थानिक गरज पाहून दिली जाणार आहे. दरम्यान मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मदत दिली जात आहे.
त्याशिवाय साईबाबा शिर्डी संस्थानच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांना तब्बल 10 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. या सोबतच 20 डॉक्टरांची टीम देखील या भागात पाठविण्यात येणार आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर सांगलीत पूरस्थिती आहे. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं. या पुराने कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सांगलीतील पुराने अनेकांचं अतोनात नुकसान केलं. बहुतेकांच्या घरातील सगळ्या वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले.

यामुळे अनेक ठिकाणाहून आवश्यक धान्य, औषधं, कपडे यासारखी मदत पूरग्रस्तांना केली जात आहे. यात सर्वसामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: