गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

गडचिरोली | सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नगर परिषद, पेट्रोल पंपसह अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. तर कन्नमवार वॉर्डामध्ये रस्त्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासांत जिल्हाभरात सरासरी 55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला.

धानोरा 89, आरमोरी 99, तर कुरखेडा 90 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या सती नदीला पूर आला आहे. सती नदीवर कढोलीजवळ असलेल्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कढोली-वैरागड मार्ग आज सकाळपासून बंद झाला आहे. आताही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात मोठी पूरसदृश स्थितीची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: