मला विधानसभेत जाण्याची संधी द्या; मी बार्शीतील गुंडगिरी, दहशत मोडून काढून संपविली -राजेंद्र राऊत

मला विधानसभेत जाण्याची संधी द्या; बार्शीतील गुंडगिरी, दहशत मोडून काढून संपविली — राजेंद्र राऊत

  बार्शी:   पंचेवीस वर्षांपूर्वी मी बार्शीच्या राजकारणात व समाजकारणात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी या लोकप्रतिनिधींनी व त्यांनी पाळलेल्या गुंडांची गुंडगिरी व प्रचंड दहशत बार्शी शहरात व तालुक्यात होती. या माजी लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या गुंडांच्या मार्फत बार्शी शहरातील अनेक कुटुंबांवर अन्याय करून ती कुटुंबे उध्वस्त करून, शहर नेहमी दहशतीखाली ठेवले अशी टीका बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केली.


शहरातील ताडसौंदणे रोड, सुभाष नगर येथील सभेत ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, बाबासाहेब कथले,प्रकाश मनगिरे, सुभाष लोढा, नवनाथ चांदणे,किरण तौर,शंकर देवकर, रामभाऊ जाधव, अमोल चव्हाण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   त्याच वेळेस या गुंडगिरी, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात खंबीरपणे लढण्यासाठी तुम्ही बार्शीकरांनी मला पाठबळ व ताकद दिली. 

   या माजी लोकप्रतिनिधींचा पापाचा घडा भरल्यामुळे तुम्ही मला जन्माला घातले.  ज्या वेळेस   या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी मी राजकारणात व समाजकारण करण्याची सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी मला संपविण्यासाठी माझ्यावर अनेक प्राणघातक हल्ले केले.परंतु हल्ल्यांना न घाबरता,न डगमगता मी ताठपणाने जशास तसे उत्तर देऊन त्यांच्या सोबत लढलो. ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत काम केले त्यांच्या घरावर अन्याय करण्याचा, गुंडगिरी करण्याचा प्रयत्न या माजी लोकप्रतिनिधींनी  व त्यांच्या गुंडांनी केला.परंतु तो प्रयत्न मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर व पाठबळाच्या ताकदीवर तो प्रयत्न उधळून लावला. यापुढेही कोणी गुंडगिरी,दहशत करण्याचा प्रयत्न केला तर ती मोडीत काढून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

   माजी लोकप्रतिनिधींनी, शिवरायांच्या या भगव्या झेंड्याला कायम विरोध करीत शिवजयंती साजरी करण्यालासुध्दा नेहमीच विरोध केला.तेच आज स्वतःच्या स्वार्थासाठी, संधीसाधू पणाने भगवा झेंडा हातात घेऊन जनतेची फसवणूक करीत आहेत.त्यांना हा भगवा झेंडा हातात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे ते म्हणाले.

   या माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांच्या पिलावळींनी नेहमीच व्यापारी बांधवांना, उद्योजकांना वेठीस धरून बाजार समिती, औद्योगिक वसाहत, व्यापार पेठेवर  दहशत निर्माण करून मुक्तपणे व्यापार करू दिला नाही.त्याचाच परिणाम म्हणून बार्शीच्या व्यापारपेठेचे वैभव संपून बार्शीचे अर्थकरण संपले.

त्यांच्या या वाईट प्रवृत्तीला बार्शीतून हद्दपार करण्याची आता वेळ आली आहे. माझी सर्व व्यापारी बांधव, उद्योजकांना विनंती आहे की, आता आपण त्यांच्या गुंडगिरीला भिक न घालता,न डगमगता आपण सर्वांनी मिळून बार्शीला गतवैभव प्राप्त करून देऊ. याकरिता मी खंबीरपणे तुमच्या सोबत असून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आपल्या बार्शी तालुक्यात आपण सर्वांनी मिळून पुन्हा लक्ष्मी नांदवू व तालुक्याची ही औदसा कायमस्वरूपी हाकलून देवू असे ते म्हणाले.

   बार्शी तालुक्यातील या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी आपण माझ्या ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून या निवडणुकीत मला विजयी करावे अशी विनंती व आवाहन केले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: