मी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे विरोधक नारळ फोडून श्रेय घेत आहेत:दिलीप सोपल

बार्शी ः वैरागकरांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या वैराग तालुका निर्मिती बरोबरच कायम निसर्गलहरीवर अवलंबून असलेल्या बार्शी तालुक्यात हरितक्रांती घडविणार्‍या बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी वैराग भागाला देण्यासाठी जीवाचे रान करू असे सांगत बार्शी शहर व तालुक्यात आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही शिवसेना भाजप मित्रपत्र महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी दिली.

तालुक्यातील सुर्डी येथे गावभेट दौर्‍यानिमित्त ग्रामस्थांशी संवाद साधताना सोपल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवा दिंडोरे, दीपक आंधळकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात नगरसेवक विलास रेणके, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, दगडू मांगडे, राहूल कोंढारे, नागजी नान्नजकर, सुर्डीचे माजी सरपंच दादा डोईफोडे, अ‍ॅड.विकास जाधव, विनोद वाघमारे, बाजीराव मोहिते उपस्थित होते.

बार्शी शहर व तालुक्यात उद्योग निर्मितीच्या माध्यमातून बेरोजगारांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे असे सांगत सोपल म्हणाले, बार्शी शहर व तालुक्यात लोकप्रतिनिधी या नात्याने शासनदरबारी वजन वापरून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे विरोधक नारळ फोडून, भूमीपूजन करून अकारण श्रेय लाटत आहे. विकास कामांच्या नावाखाली जनतेची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल विरोधकांकडून करण्यात येत असून वैराग भागातील जनतेला वैराग भागाचा विकास कोणी केला हे चांगलेच माहित आहे.

वैराग तालुका निर्मिती, वैराग व 57 गावांना उजनीचे पाणी देणे, वैरागला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे, वैराग भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अरोहरात्र प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी सोपल यानी दिले. शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बांधील राहणार असून आपण जनताच उमेदवार असल्याच्या भावनेतून काम करा असे आवाहन केले.

सेना नेते आंधळकरांनी तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याबरोबरच वैराग तालुका निर्मितीसह शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोपलां शिवाय पर्याय नसल्याचे सांगत विरोधकांच्या ताब्यातील बार्शी नगपरिषद, बाजार समितीच्या माध्यमातून चाललेल्या कारभाराव टिका केली. यावेळी अ‍ॅड.विकास जाधव यांनी भाषण केले. सभेसाठी मंदा काळे, मंगलताई शेळवणे, करूणा हिंगमिरेसह सुर्डीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सुर्डीकरांनी सोपलांचे गावात ढाल ताशांच्या गजरात स्वागत केले तर महिलांनी औक्षण केले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: