मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’ ;वाचा कहाणी

मराठ्यांच्या पराक्रमाचा एक झाकोळलेला इतिहास म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध. या युद्धाचं वर्णन खूप समर्पक शब्दांत केलं गेलंय. “सव्वा लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या.. चिल्लरखुर्दा किती गेल्या याची गणतीच नाही..” असं वर्णन केलेलं हे युद्ध किती भीषण असेल याची प्रचिती हे ऐकूनच यावी. इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर मराठे हरले, पण, त्यानंतर पुढची अनेक वर्षं अब्दालीच काय पण कोणत्याही आक्रमकाची हिंदुस्थानात पाय टाकायची हिंमतही झाली नाही. म्हणून हिंदुस्थानच्या इतिहासातल्या अनेक निर्णायक युद्धांमध्ये या युद्धाची गणना होते. मराठ्यांचं अटकेपार पसरलेलं साम्राज्य, संपूर्ण हिंदुस्थानावर मराठ्यांनी राखलेला दबदबा आणि त्यानंतर घडलेल्या या भयंकर युद्धाचा पुनर्प्रत्यय आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ आपल्याला करून देतो.

चित्रपटाची कथा त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या ‘पानिपत 1761’ या पुस्तकातून घेतली आहे. त्यात अनेक पात्रं आहेत. पेशव्यांचा पराक्रम, त्यांचे परस्पर नातेसंबंध, होळकर-शिंदे-बुंदेले असे मराठ्यांचे भक्कम सरदार, मुघलांचा मत्सर, अब्दालीची क्रूरता आणि सदाशिवराव भाऊंचं नेतृत्व अशा सगळ्याची सरमिसळ कथेत आहे. सदाशिवराव भाऊ आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या कथेतून पानिपतची पटकथा फुलवली आहे. त्यामुळे इतर वेळी निव्वळ राजकीय वाटणाऱ्या या इतिहासाच्या मागचे मानवी भावनांचे कंगोरेही दाखवायचा प्रयत्न या चित्रपटात केलेला आहे. तो बव्हंशी यशस्वी झाला आहे. चित्रपटाची लांबी जवळपास तीन तास आहे. त्यामुळे चित्रपट दोन भागात विस्तारतो. पहिला भाग पेशव्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीचा पराक्रम, त्यांच्यातील कौटुंबिक राजकारण आणि नातेसंबंध यांपासून सुरू होतो. हा भाग तपशीलवार आला आहे. याचं चित्रणंही उत्तम झालं आहे. फक्त पेशव्यांच्या वेळची बंधनं लक्षात घेता ठिकठिकाणी घेतलेलं दिग्दर्शकीय स्वातंत्र्य चांगलंच खटकत राहतं. तुलनेने मध्यंतरानंतर जेव्हा युद्धाला सुरुवात होते, तेव्हा चित्रपट चांगलाच वेग पकडतो. सदाशिवरावांची युद्धनीती, अब्दालीला दिलेला शह, तत्कालीन राजकीय संबंधांमुळे अनेक राज्यांच्या संस्थानिकांनी दिलेली साथ आणि फिरवलेले शब्द, प्रत्यक्ष युद्धावेळी असलेली परिस्थिती असे अनेक बारकावे पकडत गोवारीकरांनी हे भीषण युद्ध साकारलं आहे. विशेष म्हणजे ही भीषणता कुठेही बीभत्स होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

पटकथेत असंख्य उणीवा आहेत. विशेषतः विजयाचं पारडं अब्दालीच्या बाजूने झुकण्यापाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यातल्या बऱ्याचशा चित्रपटाच्या पटकथेत येतच नाहीत. पण, एक व्यावसायिक चित्रपट म्हणून त्याची मोट उत्तम बांधण्यात आली आहे. तत्कालीन राजकीय घडामोडी वेगाने दाखवल्यामुळे चित्रपट पकड सोडत नाही. अर्थात पानिपताचा पट चित्रपटीय माध्यमात साकारायचा म्हणजे एक दिव्य आहे आणि आशुतोष गोवारीकर यांनी ते पार पाडलं आहे. त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याला दाद द्यावीच लागेल. विशेषतः दिल्लीच्या तख्तावर फडकलेला भगवा ध्वज पाहताना मन अभिमानाने भरून येतं. मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम, अब्दालीसारख्या बलाढ्य शत्रुसमोर उभं केलेलं तगडं आव्हान, पराभवाची छाया निर्माण होऊनही दाखवलेला पराक्रम, विश्वासराव-समशेर बहाद्दर अशा योद्ध्यांचं धारातीर्थी पडणं हे सगळं गोवारीकरांच्या याच कौशल्यामुळे आपल्या मनात उतरतं.

पाहा पानिपतचा ट्रेलर-

अभिनयाच्या बाबत बोलायचं झालं तर, अर्जुन कपूर याने साकारलेली सदाशिवराव भाऊ ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी आहे. पण, अर्जुन कपूरला अभिनयाचं अंग नाही, असं म्हणायला भरपूर वाव आहे. कारण, त्याने फक्त कायिक अभिनयाने व्यक्तिरेखा तोलून धरली आहे. उंच धिप्पाड बांध्याचे, युद्ध कौशल्याची जाण असलेले आणि रणभूमीत शत्रुवर तुटून पडणारे सदाशिवराव साकारण्यासाठी त्याने निश्चित मेहनत केली आहे. त्यासाठी त्याला गुण द्यावेच लागतील. पण, अभिनयाच्या बाबतीत त्याची म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही. किंबहुना, त्याने जर अधिक उत्तम अभिनय केला असता तर सदाशिवराव भाऊ ही भूमिका त्याच्याचसाठी लिहिली असावी, इतका तो मनाला भावून जातो. पार्वतीबाई झालेल्या क्रितीसाठी ही फार वेगळी भूमिका होती. ती तिने प्रामाणिकपणे साकारली आहे. अब्दाली झालेल्या संजय दत्तनेही भूमिकेत प्राण ओतले आहेत. फक्त काही प्रसंगांमध्ये तो तितका क्रूर वाटत नाही. त्यामुळे ती उणीव राहून गेल्यासारखं वाटतं. मराठा युद्धाची पार्श्वभूमी असल्याने अनेक मराठी कलाकार या चित्रपटात दिसतात. रवींद्र महाजनी, मिलिंद गुणाजी, गश्मीर महाजनी, कश्यप परुळेकर असे अनेक मराठी चेहरे या चित्रपटात दिसतात. यात विशेष कौतुक ते तीन कलाकाराचं. पहिले म्हणजे बऱ्याच काळानंतर चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी. दुसरा कलाकार म्हणजे त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी. जनकोजी शिंदे झालेल्या गश्मीरने व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. आणि तिसरा कलाकार म्हणजे कश्यप परुळेकर. राघोबा दादांची ग्रे शेड असलेली भूमिका कश्यपने उत्तम साकारली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेची लांबी वाढवता आली असती, तरीही चित्रपटात मजा आली असती, असं वाटतं. चित्रपटाची तांत्रिक बाजूही उत्तम आहे. गाणीही श्रवणीय आहेत. मर्द मराठा हे गाणं ऐकताना रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाही.

एकंदर, एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान ‘पानिपत’ पाहिल्यावर आपल्याला मिळतं. पानिपत युद्धाचं वर्णन जरी मराठ्यांच्या भाळावरची भळभळती जखम असं असलं तरी त्यानंतरही मराठे संपले नाहीत, तर फिनिक्सच्या भरारीने उभे राहिले. दिल्लीचं तख्त राखत अब्दालीसारख्या शत्रुशी फक्त मराठे म्हणून नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचे रक्षक म्हणून भिडले. हिंदुस्थानची भूमी ही इथल्या लोकांच्या हक्काची आहे, परकीयांना इथे स्थान नाही, या ऐक्यभावनेने लढले म्हणूनच ही लढाई हा पराभव नाही तर पराक्रमाची गाथा आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतर जाणवतं राहतं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: