मराठवाडा वॉटर ग्रीड योजना: लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याचे 3 हजार 122 कोटीचे अंदाजपत्रक तयार : बबनराव लोणीकर

मराठवाड्याला कायमस्वरुपी टंचाईमुक्त करण्यासाठी…

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाच वर्षात लातूर जिल्ह्यासाठी 644 कोटीचा निधी उपलब्ध

उस्मानाबाद वॉटर ग्रीडसाठी 1हजार 409 कोटीचे अंदाजपत्रक

लातूर : मराठवाडा कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी महत्वाकांक्षी अशी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबविणार असून यापूर्वी औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या 4 हजार 293 कोटींच्या कामाला मंजूरी दिली आहे. तर लातूर जिल्ह्यासाठी 1 हजार 713 कोटी व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार 409 कोटी चे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.

  पाणी पुरवठामंत्री लोणीकर म्हणाले, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी योजना महत्वाची आहे. यामुळे मराठवाड्यातील पुढच्या पिढीला टंचाईची जाणीव होणार नाही. कमी सरासरीने व असमान पडणारा पाऊस, भुजल पातळीत फार मोठ्या प्रमाणात झालेली घट, भुजल व भुपृष्ठावरील  पाण्याच्या साठ्यात होणारी घट, वारंवार उद्भवणाऱ्या टंचाईमुळे दरवर्षी टंचाई उपाययोजना व टँकरच्या संख्येत होणारी वाढ,  सन 2016 मध्ये लातुर शहरास रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता.व यावर्षीही लातूर जिल्ह्यात टंचाईची भीषण परिस्थिती आहे. यामुळे लातूर व  उस्मानाबाद जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात वॉटर ग्रीड ची अत्यंत आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला व मुख्यमंत्री महोदय यांनी मराठवाड्यातील टंचाईची भीषण परिस्थिती पाहता या योजनेला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लातूर जिल्ह्याचा मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यांनीही वारंवार पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे असे श्री. लोणीकर यांनी सांगितले.

तसेच औसा शहर व तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर उदगीर विधानसभा मतदार संघातील पाणीपुरवठा योजनांसाठी आमदार सुधाकरराव भालेराव तसेच माजी आमदार गोविंद केंद्रे यांनीही पाठपुरावा केलेला असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनासाठी आमदार विनायकराव पाटील लातूर ग्रामीण मतदार संघातील पाणीपुरवठा योजनांसाठी रमेश कराड यांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केलेला होता. पालकमंत्री व या सर्व लोकप्रतिनिधीनी केलेला पाठपुरावा तसेच प्रशासनाकडून योजना बाबत आलेले प्रस्ताव आणि लातूर जिल्ह्यातील टंचाईची एकंदर परिस्थिती पाहता पाणीपुरवठा विभागाकडून मागील पाच वर्षात 644 कोटी 52 लाखाचा निधी लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता योजनांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहिती श्री. लोणीकर यांनी दिली.

लातूर जिल्हा:

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन 2019- 20 साठी लातूर जिल्ह्यातील 290 गावे, वाड्या वस्त्यांच्या 333 योजनांचा 359 ,कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.यात औसा तालुक्यातील 49 योजनांसाठी 65 कोटी रुपये निलंगा तालुक्यातील 39 योजनांसाठी 40 कोटी रुपये समावेश आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत दहा कोटीच्या 13 गावांच्या दहा नवीन योजना मंजूर असून त्यापैकी चार योजनांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. व इतर 6 योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे तसेच या योजनेअंतर्गत चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनर्जीवन करण्यासाठी 43 कोटी 6 लक्ष रुपये निधी मंजूर असून यामुळे 51 गावातील 1 लाख 56 हजार लोकांना लाभ मिळणार आहे. यामध्ये औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 गावे 28 कोटी 58 लाख, खरोसासह 6 गावे चार कोटी 35 लाख, मातोळा सह 10 गावे सहा कोटी 19 लाख तर लातूर तालुक्यातील शिराळासह 5 गावे 3 कोटी 94 लाख असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मागील पाच वर्षात लातूर जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 242 शौचालयांचे बांधकाम करण्यात आलेले असून यासाठी 182 कोटी 56 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तसेच टंचाई अंतर्गत लातूर जिल्ह्यात विविध उपाय योजनांसाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.

औसा शहर पाणीपुरवठा योजना:-

औसा शहरासाठी निम्न तेरणा ( माकणी ) प्रकल्पावरून 45 कोटी 20 लाख रुपयांच्या योजनेला तांत्रिक मान्यता दिलेली असून या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून दोन दिवसात प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच औसा तालुक्यातील 50 गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम:

     या अंतर्गत सन 2019- 20 साठी राज्यातील 17 हजार 782 गावे, वाड्या व वस्त्या साठी दहा हजार पाच योजना मंजूर करण्यात आले असून त्यासाठी 12 हजार 522 कोटीचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.  या  कार्यक्रमांतर्गत सन 2014 -15 ते 18 -19 या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यातील 7 हजार 789 गावे, वाड्या व वस्त्यांच्या योजना पूर्ण करण्यासाठी 4 हजार 616 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 15 ऑगस्ट 2019 रोजी जलजीवन मिशन राबविण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम:-

    राज्यातील सोळाशे कोटींच्या 780 नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली असून याचा 1हजार 671 गावे, वाड्या व वस्त्यातील 38 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. यापैकी दोनशे योजनांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत 105 कोटीच्या बंद असलेल्या 29 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीवन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनांचा लाभ 2 हजार 339 गावे, वाडया व वस्त्या मधील लाखो नागरिकांना होणार आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड संक्षिप्त माहाती:-

मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रीत ग्रीड करण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यात दमन गंगा-पिंजाळ, तापी-नार-पार व कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.

प्रत्येक जलसंपदा प्रकल्पाची वैयक्तिक विश्वासार्हता कमी असल्यामुळे ती वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाडा पाणी ग्रीड ही लूप पद्धतीची प्रस्तावित आहे.

जिल्हा औरंगाबाद

    औरंगाबाद जिल्ह्याकरीता एकूण किंमत रु.2 हजार 764 कोटी 46 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईप लाईन 737 कि.मी. व 4 जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता 396 दशलक्ष लिटर प्रस्तावीत आहे.

जिल्हा जालना

 जालना जिल्ह्याकरीता एकूण किंमत रु.1 हजार 529 कोटी 08 लक्ष आहे त्यामध्ये एकूण पाईप लाईन 458 कि.मी. व 3 जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता 149 दशलक्ष लिटर प्रस्तावीत आहे

जिल्हा बीड

   बीड जिल्ह्याकरीता एकूण किंमत रु. 4 हजार 801 कोटी 86 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईप लाईन 1078.61  कि.मी. व 5 जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता 255 दशलक्ष लिटर प्रस्तावीत आहे.

लातूर जिल्हा:-
लातूर जिल्ह्याच्या वॉटर ग्रिट योजनेसाठी 1713 कोटीचे अंदाजपत्रक तयार केले असून मागील पाच वर्षात जिल्हयाच्या विविध पाणीपुरवठा योजनांसाठी 644 कोटी 52 लाख असे एकूण 2 हजार 357 कोटी 44 लाखाचा निधी पाणी पुरवठा विभागामार्फत लातूर जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वाटर ग्रीड अंतर्गत 1 हजार 409 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.
या कामाचे नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: