मतदान प्रक्रियेची गोपनीयता भंग केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दि.18 एप्रिल हा मतदानाचा दिवस होता. प्रशासनाने अतिशय व्यापक स्तरावर मतदार जागृती मोहीम पार पाडली. मात्र काही तरुणांनी मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले.
त्यांची ही कृती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 च्या तरतुदीचा व मतदान गोपनीयतेचाही भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत.
त्यानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 240 उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.विठठल उदमले तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.चेतन गिरासे यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशनला कळविले आहे.
प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून मतदान केंद्रांमध्ये मोबाईलचा वापर निषिध्द असल्या बाबतची योग्य ती प्रसिध्दी देण्यात आली होती. तरीही काहींनी या सूचनांकडे दूर्लक्ष करुन मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले, त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

admin: