मतदानासाठी बार्शीतील प्रशासन सज्ज 326 मतदान केंद्रे, 1795 कर्मचारी, 3 लाख 1 हजार 156 मतदार


गणेश भोळे/ धीरज करळे

बार्शी: उस्मानाबाद लौकसभा मतदारसंघातील बार्शी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातील 326 मतदान केंद्रावर 3 लाख 1 हजार 156 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील म्हणाले की, या निवडणुकीसाठी तालुक्यात 1 लाख 57 हजार 273 पुरुष तर 1 लाख 43 हजार 878 महिला व 5 तृतीयपंथी एवढे मतदार असून मूळ 319 व सहाय्यकारी 7 असे एकूण 326 मतदार केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर राखीवसह 359 पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये 1,795 अधिकारी, 32 क्षेत्रीय अधिकारी, पोलीस स्टेशननिहाय 22 पोलीस क्षेत्रीय अधिकारी, 600 पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत.  113 क्रमांकाचे जिजामाता विद्यामंदीर हे सखी मतदान केंद्र असणार आहे. सुलाखे हायस्कूल परिसरातील शिशुविहार केंद्र आदर्श मतदार केंद्र आहे.

मतदान साहित्य व ईव्हीएम मशीन वाटपासाठी शासकीय धान्य गोदामात 32 टेबल करण्यात आले आहेत. मतदान काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची बैठक घेवून आवश्यक त्या सूचना दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. या बैठकीला अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ऋषीकेत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय नाईक पाटील, आचारसंहिता प्रमुख प्रमोद काळे यांच्यासह बार्शी, वैराग, पांगरी व तालुका पोलीस स्टेशनचे प्रमुख अनुक्रमे सर्जेराव पाटील, हुंदळेकर, सुगांवकर व राहुल देशपांडे उपस्थित होते. 

रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना केलं हद्दपार

विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मतदानाचा हक्क अबाधित ठेवून 8 दिवसांसाठी तालुक्याच्या हद्दीबाहेर पाठविण्यात आले असून यामध्ये बार्शी शहर 71, तालुका पोलीस स्टेशन 50, वैराग पोलीस स्टेशन 54 व पांगरी पोलीस स्टेशन 39 असे 214 नागरिकांचा समावेश आहे.


admin: