आज भगवान महावीर जयंती, जाणून घेऊया महावीरांबद्दल

महावीर जयंती का साजरी केली जाते?

जैन धर्मातील 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन धर्मीय ‘महावीर जयंती’ म्हणून साजरा करतात. जैन धर्मातील लोक महावीर जयंतीचे पर्व ‘महापर्व’ म्हणून मानतात.

🧐 महावीर का म्हटले जाते? : भगवान महावीर यांचे लहानपणीचे नाव वर्धमान होते. त्यांनी ज्ञान प्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या तीसाव्या वर्षी राजमहलातील सुख आणि वैभव याचा त्याग करुन तपोमय साधनेचा मार्ग अवलंबला.

त्यानंतर सुमारे साडे बारा वर्ष त्यांनी साधना केली. त्यांनी तप आणि ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा आणि विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्यांना ‘महावीर’ म्हणून ओळखले जावू लागले.

🎯 महावीरांची शिकवण :

▪ भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला.
▪ निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले.
▪ इतरांना मदत करण्याचा संदेश दिला.
▪ मदतीची गरज असणाऱ्यांना मदत न करणे ही देखील एक हिंसा असल्याची शिकवण महावीरांनी दिली.
▪ कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे नाही, कल्याण करायचे व कोणालाही त्रास द्यायचा नाही.
▪ जाणते किवा अजाणतेपणातून कुणाची हिंसा करणे योग्य नाही. याशिवाय दूसर्‍यांच्या मार्फतही कुणाची हिंसा घडवून आणू नये.
▪ कुठल्याही जीवांना मन, शरीर किवा बोलण्याने दंडीत करू नका. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे.

तीर्थंकर म्हणून संबोधले का जाते? : तीर्थ म्हणजे मार्ग. दुसऱ्यांना योग्य मार्ग शोधून देणारा म्हणजेच स्वतः तरुन दुसऱ्याला तारणारा तो तीर्थंकर.

भगवान महावीर यांनी भक्तांना सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा या पाच व्रतांचे पालन करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर साधु, साध्वी, श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली. त्यामुळे त्यांना ‘तीर्थंकर’ असे म्हटले जाते.

💁‍♂ महावीर जयंती म्हणजे ‘महापर्व’ :

▪ या दिवशी जैन मंदिरात महावीरांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. त्यानंतर साग्रसंगीत पूजा करुन मूर्ती रथात बसवली जाते आणि शोभायात्रेला प्रारंभ होतो.
▪ या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गरीब व गरजूंना मदत केली जाते.

admin: