मजुरांची हतबलता ड्रामेबाजी वाटते का? सीतारमन यांच्या टीकेला कॉंग्रेसचं उत्तर

नवी दिल्ली : “मजुरांची हतबलता तुम्हाला ड्रामेबाजी वाटते का? रस्त्यांवर अनवाणी पावलांनी चालणारे शेकडो मजूर तुम्हाला ड्रामेबाज वाटतात? तहान-भुकेसाठी चालत जाणं म्हणजे ड्रामेबाजी आहे का?”, असे प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत .

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (17 मे) पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडून केली जाणारी टीका योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या. याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जावून ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका सीतारमन यांनी केली. त्यांच्या याच टीकेवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निशाणा साधला.

“स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं बंद करावं. ते मजूर आहेत, मजबूर नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. संवेदनहीन सरकारला सर्व मजुरांची माफी मागावी लागेल”, अंस सुरजेवाला म्हणाले.

“राहुल गांधी मजुरांचं दु:ख वाटण्यासाठी त्यांच्याजवळ गेले होते. दु:ख वाटणं हा अपराध असेल तर हा अपराध आम्ही वारंवार करु. मूकबधिर सरकारला मजुरांच्या समस्येबाबत जागरुत करणं अपराध असेल तर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार तो अपराध करतील. आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज तर नाहीत, त्यांना जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”, अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकंटाच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, हे पॅकेज फक्त 3.22 लाख कोटींचं पॅकेज आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची सविस्तर माहिती गेल्या पाच दिवसांपासून दररोज अर्थमंत्री निर्मला सीतारमन पत्रकार परिषद घेऊन देत आहेत. या पॅकेजबाबत माहिती देण्याची आज त्यांची शेवटची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आनंद शर्मा यांच्याकडून हे पॅकेज फक्त 3.22 लाख कोटीचं पॅकेज असल्याचा दावा करण्यात आला.

मोदींनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं पॅकेज हे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के इतकं असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पॅकेज जीडीपीच्या फक्त 1.6 टक्के असल्याचा दावा आनंद शर्मा यांनी केला.

आनंद शर्मा यांनी अर्थमंत्र्यांना चर्चेचं आव्हान दिलं आहे. “अर्थमंत्र्यांनी मला खोटं ठरवून दाखवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही माझं आव्हान आहे”, असं आनंद शर्मा म्हणाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: