किरकोळ कारणावरुन एकाचा खून तर दुसर्‍याला जिवे मारण्याचा प्रयत्न

गणेश भोळे/ धीरज करळे

बार्शी:  येथील बाळेश्‍वर नाका येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचे पेट्रोल संपल्याने स्कुटी दुचाकी चालविण्यास झालेल्या अडथळ्याच्या कारणावरुन चिडून जावून तिघांनी गुप्ती व लोखंडी पाईपच्या सहाय्याने एकास जिवे ठार मारल्याची घटना भरदिवसा घडली तर त्याचवेळी दुसर्‍याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला असून दुसरा त्यात जखमी झाला आहे.

बापू शेंडगे (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर योगेश भारत भाकरे (दोघे रा. खांडवी, ता. बार्शी)   असे जखमी झालेल्याचे नाव आहे. जखमी योगेश भाकरे यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

याबाबत प्रदीप उर्फ भैय्या बोराडे, सुनिल उर्फ तात्या राऊत व एक अनोळखी 25 वर्षाचा तरुण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी योगेश व त्याचा मित्र बापू शेंडगे असे दोघे हिरोहोंडा मोटारसायकलवरुन खांडवी गावाहून बार्शी शहरामध्ये कामासाठी आले होते. त्यांची मोटारसायकल बाळेश्‍वर नाक्याजवळ आल्यावर त्यातील पेट्रोल संपल्याने तिचा वेग कमी जास्त होवू लागला. त्यामुळे पाठीमागून पांढर्‍या रंगाच्या स्कुटीवरुन आलेल्या स्वारांना स्कुटी चालविण्यास अडथळा होत होता. फिर्यादी व त्याचा मित्र हे दोघेजण बाळेश्‍वर नाकावरील झाडाच्या सावलीत मोटारसायकल उभी करीत असताना पाठीमागून आलेले स्कुटीवरील फिर्यादीच्या ओळखीचा  स्कुटीवरील चालक प्रदीप उर्फ भैय्या बोराडे तसेच सुनील उर्फ तात्या राऊत तिघे या दोघांजवळ आले. तुला गाडी नीट चालविता येत नाही का म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर वरील तिघे तुला बघून घेतो असे म्हणून पोस्ट चौकाकडे निघून गेले. त्यावेळी फिर्यादीने मित्राला फोन करुन गाडीतील पेट्रोल संपल्याचे सांगितले. मी मित्र लागेच तिकडे येतो म्हणाला व तो तेथे थोड्या वेळात आला. त्याला त्यांनी वाद झाल्याचे सांगितले. पेट्रोल बाटलीमध्ये घेवून येवून बाळेश्‍वर नाक्याजवळ आले. त्यावेळी स्कुटीवरुन वाद करुन गेलेले तिघेजण तेथे आले. दोघांच्या हातात गुप्ती होती. अनोळखी इसमाच्या हातात लोखंडी पाईप होता. त्यांनी स्कुटी त्यांच्या जवळ लावून जवळ येवून बापू शेंडगे यास सुनिल उर्फ तात्या राऊत याने त्याच्याकडील गुप्तीने पोटात भोकसले व अनोळखी इसमाने शेंडगे याच्या डोक्यावर मारहाण केली. त्यावेळी तो जमिनीवर पडला. त्यावेळी फिर्यादी सोडविण्यास जात असताना प्रदीप उर्फ भैय्या बोराडे याने  त्याच्याजवळील गुप्तीने फिर्यादीवर हल्ला केला. तो फिर्यादी चुकवित असताना मारलेल्या गुप्तीचा वार त्याच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यावर लागला. त्यानंतर आरोपी कुर्डुवाडीच्या दिशेने निघून गेले. 

दरम्यान उपचारासाठी दोघालाही जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना बापू शेंडगे याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांत भादंवि 302, 307, 34 आर्म अ‍ॅक्ट 4 व 25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 तसेच अ‍ॅट्रासिटी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद झाला असून याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय नाईक पाटील हे करीत आहेत.

admin: