बार्शी उपसा सिंचनचे पाणी तालुक्यात दाखल ,दोन्ही राजकीय गटांनी केले पाणीपुजन

बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यात दाखल ,दोन्ही राजकीय गटांनी केले पाणीपुजन
उपळाई-खांडवी सह नागोबाचीवाडी व बार्शीतील तलाव भरले जाणार

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी तालुक्यात अत्यल्प पाऊस पडलेला असल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेल्यातच जमा झालेली आहेत़ तालुक्यातील एकही ओढा किंवा नदीला पाणी आले नाही,त्यामुळे भिमा-सिना जोडकालव्यातील बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यातील उपळाई शिवारावरील कॅनॉलमध्ये सुटले असून या पाण्यामुळे तालुक्यातील उपळाई, खांडवी, शेंद्री, अलिपूर या गावातील पाझर तलाव भरुन घेण्यास फायदा होणार आहे. दरम्यान तालुक्यातील राऊत व सोपल या दोन्ही गटांनी या पाण्याचे पुजन केले.

मुळात अपूर्ण व अर्धवट अवस्थेत असलेल्या या योजनेच्या पुर्णत्वासाठी शंभर कोटीपेक्षा जास्त पैशाची गरज आहे़ युती शासनाच्या काळात उजनी धरणातून सीना नदीत सोडल्या जाणाºया पाण्यातून बार्शी तालुक्यातील शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी बार्शी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली. सुरुवातीच्या काळात या योजनेचे काम झाले.

मात्र नंतरच्या काळात निधीअभावी ही योजना रखडली. दरवर्षी बजेटमध्ये अत्यल्प निधीची तरतूद होत असल्याने या योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरु राहिले. मध्यंतरीच्या काळात जो काही निधी आला त्याच्याबाबतही आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात दावे-प्रतिदावे होत होते. आमदार सोपल मंत्री असताना या योजनेचे पहिल्यांदा पाणी आले.

त्याचे पूजनही धुमधडाक्यात झाले. त्यानंतर एक-दोन वेळा तलावात पाणी सोडले गेले.मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये व यावर्षी आज हे पाणी सोडण्यात आले आहे़ राज्यात सर्वत्र महापूर असताना बार्शी तालुक्यात मात्र भयावह स्थिती आहे.

उजनी धरणाच्या पाणी वाटपामध्ये बार्शी तालुक्यातील शेतीसाठी 2.59 टीएमसी पाणी राखीव आहे. उपसा सिंचन योजना अर्धवट अवस्थेत आहे. योजना पूर्णत्वाकडे जाण्यासाठी अजून सुमारे 125 कोटींची गरज आहे. योजना पूर्ण झाल्यास तालुक्यातील 12,450 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सद्यस्थितीला डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे तर उजव्या कालव्यातील गाताचीवाडी हद्दीपर्यंत कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढे सायफन चे काम थांबले आहे़ जामगावच्या पुढे अरणगाव व तावडी शिवारात देखील कॅनालची कामे सुरु आहेत.

पहिल्या टप्प्यातील पंपगृह व कॅनॉलचे काम पूर्ण झाल्याने शुक्रवारी दुपारी सोडलेल्या पाण्यातून उपळाई हद्दीतील 3 व खांडवीतील 1 असे 4 तलाव भरले जात आहेत. खांडवी व उपळाई गावातील काही शेतकºयांना ही पाणी मिळणार आहे़ शनिवारी सकाळी हे पाणी लक्ष्याचीवाडी येथील पंपहाऊसमध्ये दाखल झाल्यानंतर ते पुढे नागोबाचीवाडी, गाडेगाव मार्गे बार्शी शिवारात येणार आहे़ या पाण्याने शहरातील सुभाषनगर तलाव देखील भरला जाणार आहे.

150 क्यूसेक पाणी

शुक्रवारी सकाळी १० वाजता रिधोरे येथील बंधाºयातून १३७५एच़पी़च्या तीन मोटारीने १५० क्युसेक्स पाणी उचलले जात आहे़ तर टप्पा दोनमधील लक्ष्याचीवाडी येथे ३५० एच़पी़च्या चार मोटारीने हे पाणी दुबार उचलले जाणार आहे़ यामध्ये एकूण २८ बंधारे व दहा तलाव भरले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाचे उपअभियंता एम़टी़ कांबळे यांनी सांगीतले.

यांनी केले पाणी पुजन

दरम्यान शुक्रवारी दुपारी माजी आ़ राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मांजरे,बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे,नगरसेवक संतोष बारंगुळे,कय्युम पटेल,उमेश बारंगुळे, वैभव शिंदे, उमेश काळे, बाळासाहेब खराडे,काका जामदार, आण्णा लुंगसे, यांच्यासह पदाधिकारी उपळाई, खांडवी,वागरवाडी येथील शेतकरी यांच्या उपस्थितीत पाणी पूजन केले. पालकमंत्र्याडे आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे पाणी सुटल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगीतले.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आर्यन सोपल यांनी देखील सायंकाळी उपळाई शिवरात पदाधिकारी व गावकºयांच्या साथीने या पाण्याचे पुजन केले़यावेळी मनिष चौहान, विजय ठोंगे, आप्पासाहेब फुरडे, युवराज ठोंगे उपस्थित होते़ आ़ दिलीप सोपल यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांशी बोलून हे पाणी सोडले असल्याचे त्यांनी सांगीतले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: