बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल-शरद पवार

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. पवारांच्या वक्तव्यावरून त्यांना बारामतीत पराभवाची भीती वाटत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. एबीपी  माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील वक्तव्य केले. देशात लोकशाही टिकून राहावी. तसेच लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास टिकून राहील यासाठी ईव्हीएम यंत्रणेचं निर्दोषत्व आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमचे कोणतेही बटण दाबले तर मत भाजपलाच जात आहे, अशी माहिती मला जनतेकडून मिळाली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचं वाचनात आलं.

मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही, असं पवारांनी सांगितलं. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसानं सांगतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं.


दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असं काही घडलं तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पवारांनी निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहायला हवा, असं मत व्यक्त केलं. दरम्यान बारामती लोकसभा मतदासंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत .

admin: