प्रचारातून निवांत होताच शरद पवार नातू रोहित सह थेट वाघा बॉर्डरवर

ग्लोबल न्युज नेटवर्क:
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच शरद पवार हे दुष्काळी भागातील दौऱ्यावर गेले. येथे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन मुंबईत पक्षाची बैठक घेतली… आणि हे सर्व उरकून पंजाब मध्ये अभ्यास दौऱ्यावर गेले. त्याठिकाणी सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डर ला ही भेट दिली.
त्यांच्या सोबत असलेले नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर म्हटले आहे की,पंजाबच्या भूमीशी साहेबांच एक वेगळ नातं आहे. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाब अशांत होता. अशा वेळी लोंगोवाल-बादल यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांनी पार पाडली. त्याच फलित म्हणजे प्रसिद्ध असा राजीव गांधी आणि लोंगोवाल यांच्यात झालेला करार. या करारामुळे भारतातील अस्थिर वातावरण शांत होण्यास मदत झाली.

हे सांगण्याच कारण म्हणजे, काल वाघा बॉर्डर येथे आदरणीय साहेबांच्या सोबत भेट देण्यात आली. पंजाब येथे शेती क्षेत्राच्या अभ्यासदौऱ्यातून वेळ काढत आम्ही वाघा बॉर्डरला जात आहोत हे समजल्यानंतर आदरणीय साहेब देखील आमच्यासोबत उत्साहाने सहभागी झाले. संरक्षणमंत्री असताना त्यांना आलेले अनुभव, राष्ट्रीय सुरक्षेच महत्व अशा कित्येक गोष्टींबद्दल साहेब अगदी उत्साहाने सांगत होते.

वाघा बॉर्डरला भेट दिल्यानंतर आपल्या कुटूंबाचा, आपल्या घराचा विचार न करता दिवसरात्र सुरक्षा करणारे आपले जवान पाहून जवानांप्रती असणारा अभिमान द्विगुणित होतो. BSF चे जवान, भारतीय लष्कराचे जवान यांच्या उपस्थितीत जय हिंदच्या घोषणा, टाळ्या, विजयाचं असणारं वातावरण पाहून एक भारतीय म्हणून असणारा अभिमान देखील कित्येक पटीने उंचावतो. कित्येकांच्या लढ्यातून आपणाला हे स्वातंत्र मिळालं आहे याची असणारी जाणिव व एक भारतीय नागरिक म्हणून स्वत:बद्दलची असणारी जबाबदारी देखील द्विगुणित होते.

वाघा बार्डर नंतर इतर जेष्ठ नेते, सहकारी यांच्यासोबत अमृतसर येथील सुवर्णमंदीरास भेट देवून दर्शन घेण्यात आले.

admin: