पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, आपल्या काळात कॉंग्रेस पक्षाच्या जागा कमी कशा आल्या याची काळजी करावी – विखेंचा सल्ला

अहमदनगर |  कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले. पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, ज्याच्यामुळे कॉग्रेस पक्षाची अधोगती झाली त्याची काळजी करावी. ते मुख्यमंत्री असताना राज्यात 82 वरून 42 जागा आल्या. तसेच माझ्या विरोधातील याचिका न्यायालयात असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे मत विखेंनी मांडले.

गृहनिर्माण पदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या मुळगावी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचे दर्शन घेतले आणि जनतेशी संवाद साधला.

पुढे बोलताना विखे म्हणाले की, माझ्यावर पक्षाने विश्वास व्यक्त करत कँबीनेट पद दिले आहे. पंतप्रधान, पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहाण्याचा माझा प्रयत्न राहील .

चव्हाण यांनी अशी केली होती टीका

दरम्यान, काग्रेस सोडून भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात 2003 मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसतून भाजापात आलेले विखे व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रीपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता

धिरज करळे: